इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना गमावला. ज्यामुळे भारतीय संघावर चांगलीच टीका होऊ लागली आहे. पहिल्या डावातील भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला. यामुळे इंग्लंडचा संघ या मालिकेत १-१ ने बरोबरीत आला आहे. भारताच्या या पराभवानंतर अनेक दिग्गज मंडळींनी भारताला त्यांच्या संघ निवडीबाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे. यातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने देखील भारतीय संघाला संघ निवडीबाबत एक सल्ला दिला आहे.
नासिक हुसेनने भारतीय संघात बदल करण्याचे सुचवले आहे. यावर डेली मेलमध्ये लिहिलेल्या लेखामध्ये मत व्यक्त करताना नासिर म्हणाला, “भारतीय संघाने त्यांचा योग्य संतुलित संघ निवडला पाहिजे.” तसेच नासिरने रिषभ पंतच्या खराब कामगिरीवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे. रिषभ पंतचे इंग्लंडसारख्या परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर खेळणे योग्य नसल्याचे देखील मत व्यक्त केले.
यावर बोलताना नासिर म्हणाला, “पंतला इंग्लंडच्या परिस्थितीत ड्यूकसारख्या चेंडूने खेळताना अडचण निर्माण होत आहे. पंत या इंग्लंड दौऱ्यात खेळण्याचे कारण म्हणजे, भारतीय संघाजवळ सध्या हार्दिक पांड्यासारखा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू नाही.”
तसेच आणखी पुढे बोलताना नासिर म्हणाला, “भारतीय संघाजवळ जे आहे, तो एक ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. जो कसोटीमध्ये गोलंदाजीच्या बाबतीत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तो म्हणजे रविचंद्रन अश्विन. तो चांगली फलंदाजी देखील करू शकतो. अश्विनने आत्तापर्यंत कसोटीमध्ये ५ शतके लगावले आहेत. त्याला इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील खेळवले गेले पाहिजे होते. मात्र पुढच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याला नक्कीच संधी मिळाली पाहिजे.”
नासिर हुसेनच्या मते भारताने त्यांच्या संघात संतुलन आणण्याची गरज आहे. ज्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे अश्विन, जो एका वेगवान गोलंदाजाची चौथ्या कसोटी सामन्यात जागा घेऊ शकतो. तो गोलंदाज ईशांत शर्मा असू शकतो.
मागील सामन्यात इशांत शर्मा आपली छाप सोडू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी अश्विनला संघात संधी मिळू शकते. तसेच सध्या रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. जर तो चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी तंदुरुस्त झाला, तर अश्विनसोबत जडेजाला देखील खेळवले जाऊ शकते.
परंतु या दरम्यान नासिरने इंग्लंड संघाला देखील सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच भारतीय संघाला कमी न लेखण्याचा देखील इशारा केला आहे. त्याच्या मते भारतीय संघाला पुनरागमन करणे चांगलेच माहित आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे देखील त्याने उदाहरण दिले. तेव्हा भारतीय संघ ॲडलेडमध्ये केवळ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने उत्कृष्टरीत्या मालिकेत पुनरागमन केले आणि ती मालिका २-१ ने आपल्या नावे केली, तेही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे पुढील २ सामने दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघात महत्त्वाचे बदल झालेले दिसू शकतात. पुढचा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानात २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–‘विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,’ रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती
–बीसीसीआयने जाहीर केले रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार सामने
–रोहितच्या इंग्लंडमधील फलंदाजीने ‘हा’ बडा खेळाडू प्रभावित, शतक ठोकण्याची व्यक्त केली इच्छा





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा