इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेला सुरुवात झाली आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू आहेत. त्यामुळे आतपर्यंत या सामन्यात अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले आहेत. तिसऱ्या दिवसाचा (१० डिसेंबर) खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाकडे ५८ धावांची आघाडी आहे.
ऍशेस कसोटी मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत असते. या सामन्यातील पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंचा बोलबाला होता. पहिल्या दिवशी (८ डिसेंबर ) पॅट कमिन्सने पाच गडी बाद केले, तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (९ डिसेंबर) डेविड वॉर्नर, मार्नस लॅब्यूशेन आणि ट्रेविस हेड यांनी तुफानी खेळी केली.
दरम्यान, तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघातील फलंदाजांनी संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा घाम काढला. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड संघाने २ बाद २२० धावा केल्या आहेत. यादरम्यान, डेविड मलान नाबाद ८०, तर कर्णधार जो रूट नाबाद ८६ धावा करून मैदानावर टिकून आहे.
इंग्लडच्या फलंदाजांनी सावरला डाव
पहिल्या डाव अवघ्या १४७ धावांवर संपुष्टात आल्यानंतर इंग्लंड संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला होता. त्यामुळे इंग्लंड संघ या सामन्यात पुनरागमन करेल की नाही, असे वाटू लागले होते. तसेच सलामीवीर फलंदाज हसिब हमिद अवघ्या २७ ते रॉरी बर्न्स अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर डेविड मलानने येऊन नाबाद ८० धावा केल्या. तसेच जो रूटने नाबाद ८६ धावांची खेळी करत इंग्लंड संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने उभारला होता ४२५ धावांचा डोंगर
या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघ १४७ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १५२ धावांची खेळी केली, तर डेविड वॉर्नरने ९४ धावांचे योगदान दिले होते. तसेच मार्नस लॅब्यूशेनने ७४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात ४२५ धावा करण्यात यश आले होते.
महत्वाच्या बातम्या :
मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?