साउथॅंप्टन| इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवार, 30 आॅगस्टपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना द रोज बॉल मैदानावर होणार आहे.
भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटीमालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला या चौथ्या सामन्यातून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. तर इंग्लंड हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल.
यामालिकेत भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात पराभव स्विकारला तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले आहे.
या चौथ्या सामन्याआधी भारताच्या 18 जणांच्या संघातून अनुभवी सलामीवीर मुरली विजय आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी उर्वरित चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापनाला 18 खेळाडूंमधून 11 जणांचा संघ निवडताना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.
परंतू तरीही संघव्यवस्थापन तिसऱ्या कसोटीतील संघच कायम ठेवण्याची शक्यता दाट आहे. तसे संकेतही कर्णधार विराट कोहलीने सामन्याआधी झालेल्या पत्रकारपरिषदेत दिले आहेत.
तिसऱ्या कसोटीत विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन,जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी असा संघ खेळला होता.
त्याचबरोबर अश्विनही दुखापतीतून सावरला असल्याचे कोहलीने सांगितले आहे.
तसेच या मैदानावरील खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताकडून जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या पैकी ज्यांना 11 जणांच्या संघात संधी मिळेल त्यांच्यावर वेगवान गोलंदाजीची भिस्त असेल.
तसेच या मालिकेत चांगली कामगिरी केला फिरकी गोलंदाज आर आश्विन जर पूर्ण फिट असेल तर त्यालाच फिरकी गोलंदाज म्हणून पहिली पसंती मिळेल. पण जर तो फिट नसेल तर रविंद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारताच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली बरोबरच अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल बरोबरच मधल्या फळीवरही असणार आहे.
तसेच भारतीय संघ व्यवस्थापन भारत अ संघाकडून इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला धवन किंवा राहुल ऐवजी सलामीला संधी देणार का हे देखील पहावे लागेल.
इंग्लंड संघाच्या फलंदाजीची जबाबदारी ही अॅलिस्टर कूक, कर्णधार जो रुट, जॉस बटलर,जॉनी बेअरस्टो अशा खेळाडूंवर अवलंबून असेल. तर गोलंदाजीत जेम्स अँडरसन हा अनुभवी गोलंदाज संघात आहे. तसेच त्याच्या जोडीला स्टुअर्ट ब्रॉड, मोइन अली, अदिल रशीद असे गोलंदाज आहेत.
याबरोबरच अष्टपैलू खेळाडू म्हणून बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स यांच्याकडेही लक्ष असेल. तर पहिल्या दोन कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या सॅम करनला चौथ्या सामन्यात खेळवणार का हे पहावे लागेल.
तसेच बेअरस्टोला झालेल्या दुखापतीमुळे जेम्स विन्सला इंग्लंडच्या 14 जणांच्या संघात स्थान देण्यात आले असल्याने त्याला 11 जणांच्या संघात संधी दिली जाणार का की बेअरस्टोलाच कायम ठेवले जाणार हा प्रश्न आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 60 कसोटी सामने झाले असुन भारताला यात फक्त 7 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर इंग्लंडने 32 सामने जिंकले आहेत आणि 21 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
तसेच द रोज बॉल मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यात याआधी फक्त एकच सामना झाला आहे. हा सामना 2014 मध्ये झाला होता यात इंग्लंडने 266 धावांनी विजय मिळवला होता.
त्याचबरोबर गुरुवारी होणारा सामना हा या मैदानावरील एकूण तिसराच कसोटी सामना असणार आहे. याआधी 2011 ला इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा सामना झाला होता तर 2014 मध्ये इंग्लंडचा भारताविरुद्ध कसोटी सामना झाला होता.
इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे चौथा कसोटी सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना 30 आॅगस्ट 2018 पासून सुरु होणार आहे.
कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना साउथॅंप्टन येथील द रोज बॉल मैदानावर होणार आहे.
किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
सोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना पाहता येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, हार्दिक पंड्या, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह , इशांत शर्मा, मोहम्मद शमी.
इंग्लंड: जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअरस्ट्रो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, अँलिस्टर कुक, सॅम करन, केटॉन जेनिंग्स, ओली पोप, जेम्स विन्स, बेन स्टोक्स, आदिल राशिद आणि ख्रिस वोक्स.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: स्वप्ना बर्मनने मिळवून दिले भारताला हेप्टॅथलॉनमधील पहिले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक
–सुवर्णपदक विजेत्या या भारतीय धावपटूने ५ महिन्याच्या आपल्या मुलाला अजूनही पाहिलेले नाही!