---Advertisement---

विराटसेना हेडिंग्लेवर करणार ‘पदार्पण’, आजपर्यंत अशी राहिलीये या मैदानावरील भारत-इंग्लंडची कामगिरी

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 2:00 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (२५ ऑगस्ट) ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल. या कसोटी मालिकेत सध्या भारतीय संघ १-० अशा फरकाने आघाडीवर आहे.

त्यामुळे हेडिंग्लेवर होणारा तिसरा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत पराभव होणार नाही, हे निश्चित करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल. तर इंग्लंड संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.

हेडिंग्लेच्या मैदानावर दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. भारतीय संघालाही या मैदानावर यापूर्वी चांगले यश मिळाले आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटचे घरचे मैदान असणाऱ्या या मैदानावर इंग्लंडचीही कामगिरी चांगली झाली आहे.

भारताचा हेडिंग्लेवरील इतिहास 
भारतीय संघाने या मैदानावर आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत. तसेच या मैदानावर भारतीय संघाने गेल्या ५४ वर्षांपासून एकही सामना गमावला नाही. भारताने या मैदानावर खेळलेल्या ६ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापैकी १ सामना अनिर्णीत राहिला आहे. भारतीय संघाने या मैदानावर खेळलेल्या शेवटच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.

भारताने या मैदानावर १९५२, १९५९, १८६७, १९७९, १९८६ आणि २००२ या साली सामने खेळले आहेत. त्यातील १९५२, १९५९ आणि १९६७ साली भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मात्र, भारताने या मैदानावर पराभव स्विकारलेला नाही. भारताने या मैदानावर अखेरच्या २००२ साली खेळलेल्या कसोटी सामन्यांत राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने शतकं केली होती.

इंग्लडची हेडिंग्लेवरील कामगिरी 
इंग्लंडने आत्तापर्यंत या मैदानावर ७७ सामने खेळले असून ३४ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर २५ सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच यजमानांना १८ सामने अनिर्णीत राखण्यात यश आले आहे. या मैदानावर इंग्लंडने शेवटच्या दोन्ही कसोटीत विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे या मैदानावर इंग्लंडने खेळलेला अखेरचा सामना बेन स्टोक्सच्या कामगिरीमुळे अविस्मरणीय ठरला आहे. इंग्लंडने २०१९ साली ऍशेसमधील तिसरा सामना या मैदानावर खेळला होता. या सामन्यात इंग्लंड संघ पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या १७९ धावांना प्रतिउत्तर देताना केवळ ६७ धावांवर सर्वबाद झाला होता.

असे असतानाही दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २४६ धावांवर रोखत ३५९ धावांचे भलेमोठे आव्हान पार करत इंग्लंडने विजय मिळवला होता. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने कमालीची कामगिरी केली होती. त्याने १३५ धावांची नाबाद खेळी करताना अखेरच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर नाबाद ७६ धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे इंग्लंडने हा सामना केवळ १ विकेटने जिंकला होता.

भारतीय खेळाडूंचा हेडिंग्लेवर पहिलाच सामना
भारताने हेडिंग्लेवर अखेरचा सामना २००२ साली खेळला असल्याने सध्याच्या संघातील सर्वच खेळाडूंचा हेडिंग्लेवरील हा पहिला-वहिला कसोटी सामना असणार आहे. सध्याच्या भारतीय संघातील एकाही खेळाडूकडे हेडिंग्लेवर कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे आता या मैदानावर हा नवा भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भारत आणि इंग्लंडमधील आमने-सामने आकडेवारी
भारत आणि इंग्लंड संघ आत्तापर्यंत कसोटीत १२८ सामन्यांत आमने-सामने आले आहेत. त्यातील ३० सामन्यांत भारताने, तर ४८ सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवला आहे. ५० सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्याचबरोबर १२८ सामन्यांपैकी ६४ सामने इंग्लंडमध्ये झाले आहेत. त्यातील ८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर, इंग्लंडने ३४ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर २२ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

तिसऱ्या कसोटीसाठी यातून निवडण्यात येतील ११ जणांचे संघ – 
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मयंक अगरवाल , सूर्यकुमार यादव, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ.

इंग्लंड – जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, सॅम करन, डॅन लॉरेन्स, साकीब मेहमूद, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, मार्क वूड.

महत्त्वाच्या बातम्या –

“कर्णधार म्हणून विराटपेक्षा धोनी जास्त आवडतो, तो अजित यांच्यासारखा वाटतो”, वाडेकरांच्या पत्नीकडून कौतुक

‘आम्हाला डिवचल्यास शांत बसणार नाही’, तिसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार कोहलीची इंग्लंडला चेतावणी

आयसीसीची ‘मोठी’ कारवाई! यावर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या ‘या’ खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---