ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने आपला संघ दोन महिने आधीच घोषित करत विश्वचषक मोहिमेचा श्रीगणेशा केला. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) इंग्लंडचा पुरुष व महिला संघ पाकिस्तान दौर्यावर येणार असल्याची घोषणा केली आहे. हा दौरा विश्वचषकाच्या ऐनआधी खेळला जाईल. पुरुष संघ या दौऱ्यावर दोन टी२० तर, महिला संघ तीन वनडे सामने खेळेल.
असा असेल दौरा
इंग्लंडचा महिला आणि पुरुष क्रिकेट संघ ९ ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये उतरतील. पुरुष संघाचे दोन्ही सामने अनुक्रमे १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी खेळले जातील. इंग्लंडच्या पुरुष संघाला सरावाची ही मोठी संधी आहे. कारण, ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकही होणार आहे. अशा स्थितीत दोन टी -२० आंतरराष्ट्रीय सामने तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
इंग्लंडचा पुरुष संघ १५ ऑक्टोबरला दुबईकडे रवाना होईल. इंग्लंड महिला संघ अनुक्रमे १७, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी तीन वनडे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये राहणार आहे. २००५-२००६ नंतर इंग्लंडचा हा पहिला पाकिस्तान दौरा असेल. हे सामने आधी कराचीमध्ये खेळले जाणार होते. मात्र, नंतर ते स्थान बदलून रावळपिंडी करण्यात आले.
पीसीबीने दिली अशी प्रतिक्रिया
या मालिकेबाबत बोलताना पीसीबी अध्यक्ष अक्रम खान म्हणाले, “२००५ नंतर इंग्लंडचा हा पहिला पाकिस्तान दौरा असेल. पुरुष आणि महिला संघांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. हा दौरा छोटेखानी असेल. यानंतर, पुढील वर्षी कसोटी मालिका आणि वनडे मालिकांसाठी इंग्लिश संघ पुन्हा पाकिस्तानचा दौरा करेल.”
विदेशी संघ करतायेत आशियाचे दौरे
टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी परदेशी संघ आशियामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. टी२० विश्वचषक यूएईच्या मैदानावर होणार आहे. अशा स्थितीत संथ खेळपट्ट्या असलेल्या देशांचे दौरे वाढले आहेत. ऑस्ट्रेलियाने नुकताच बांगलादेशचा दौरा केला. यानंतर, न्यूझीलंड संघ बांगलादेशमध्ये येणार आहे. अखेरीस, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान पाकिस्तानमध्ये टी२० मालिका खेळली जाईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ ही लवकरच मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी श्रीलंकेत पोहोचेल.
महत्त्वाच्या बातम्या –
डाव्या हाताने क्रिकेटमध्ये उजवी कामगिरी करणारे दिग्गज भारतीय खेळाडू, पाहा खास आकडेवारी
टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीची नवी घोषणा; संघात आता ‘एवढ्याच’ सदस्यांचा होणार समावेश