---Advertisement---

ENGvsIND, 3rd Test: पुजारा, रोहित, विराटने जागवल्या भारताच्या आशा; तिसऱ्या दिवसाखेर २ बाद २१५ धावा

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 10:59 PM
---Advertisement---

लीड्स। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले मैदानावर सुरु आहे. शुक्रवारी(२७ ऑगस्ट) सामन्याचा तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ८० षटकात २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजून १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने दुसरे सत्र पुर्ण खेळल्यानंतर तिसऱ्या सत्रात त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, रोहितला ४८ व्या षटकात ऑली रॉबिन्सनने पायचीत बाद केले. रोहितने डीआरएसचा वापर केला होता. मात्र, त्यात अंपायर्स कॉल आल्याने आणि मैदानावरील पंचांनी रोहितला आधीच बाद दिलेले असल्याने रोहितला माघारी फिरावे लागले. रोहितने १५६ चेंडूत ५९ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

रोहित बाद झाल्यानंतर मात्र, पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. त्या दोघांनीही खराब चेंडूंचा समाचार घेत भारताला २०० धावांचा आकडा पार करुन दिला. दरम्यान, पुजाराने या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. त्याला विराटनेही उत्तम साथ देताना तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत नाबाद ९९ धावांची भागीदारी रचली.

तिसऱ्या दिवसाखेर पुजारा १८० चेंडूत १५ चौकारांसह ९१ धावांवर नाबाद आहे. तर विराट कोहली ९४ चेंडूत ६ चौकारांसह ४५ धावांवर नाबाद आहे.

रोहितचे अर्धशतक

दुसऱ्या सत्रात रोहिश शर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या चेतेश्वर पुजाराने भक्कम साथ दिली. त्यामुळे भारताला दुसरा डाव सावण्यात मदत झाली. तसेच भारताने १०० धावांचा टप्पाही पार केला. या दोघांनी खराब चेंडूंना सीमारेषेचा मार्ग दाखवत धावफलकही हलता ठेवला. दरम्यान रोहितने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. याबरोबरच त्याची आणि पुजाराही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

भारताने दुसऱ्या सत्राखेर ४६ षटकांत १ बाद ११२ धावा केल्या आहेत. अजूनही भारत २४२ पिछाडीवर आहे. रोहित ५९ धावांवर, तर पुजारा ४० धावांवर नाबाद आहे.

रोहित-केएल राहुलने पहिले सत्र सांभाळले 

इंग्लंडला पहिल्या डावात ४३२ धावांवर सर्वबाद केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. या दोघांनीही सावध खेळ करताना इंग्लंडला लवकर यश मिळू दिले नाही. रोहित आणि राहुल या दोघांनीही पहिल्या सत्रात संयमी पवित्रा स्विकारला होता. त्यांची भागादारी हळूहळू रंगत असतानाच केएल राहुल १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर क्रेग ओव्हरटच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ५४ चेंडूत ८ धावा केल्या.

केएल राहुलच्या विकेटसह तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपले. पहिल्या सत्राखेरपर्यंत भारताने १९ षटकात १ बाद ३४ धावा केल्या. रोहित शर्मा ६१ चेंडूत २५ धावांवर नाबाद आहे. तसेच भारत अजूनही ३२० धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडला ३५४ धावांची आघाडी

इंग्लंडचा पहिला डाव १३२.२ षटकात ४३२ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे इंग्लंडने ३५४ धावांनी भलीमोठी आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून या डावात कर्णधार जो रुटने १२१ धावांची शतकी खेळी केली. तर रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी अर्धशतके झळकावत १३५ धावांची सलामी दिली. बर्न्सने ६१ आणि हमीने ६८ धावांची खेळी केली. तर क्रेग ओव्हरटनने ३२ धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

तिसऱ्या दिवशी इंग्लंडने १२९ षटकांपासून आणि ८ बाद ४२३ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. इंग्लंडकडून दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेली क्रेग ओव्हरटन आणि ऑली रॉबिन्सन यांच्या जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र, हे दोघेही फार काळ टिकू शकले नाही. मोहम्मद शमीने ओव्हरटनला १३२ व्या षटकात ३२ धावांवर पायचीत केले. तर १३३ व्या षटकात रॉबिन्सनला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत करत इंग्लंडचा डाव ४३२ धावांवर संपवला. भारताचा पहिला डाव ७८ धावांवर संपुष्टात आला आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
रॉरी बर्न्स, हसिब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर ओली रॉबिन्सन, मोईन अली, सॅम करन, क्रेग ओव्हरटन व जेम्स अँडरसन

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व इशांत शर्मा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---