---Advertisement---

ENGvsIND, 3rd Test: गोलंदाजांची कमाल अन् सलामीवीरांची अर्धशतकं, पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व; दिवसाखेर बिनबाद १२० धावा

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 11:23 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवशी पहिल्या डावात ४२ षटकात बिनबाद १२० धावा केल्या आहेत. तसेच ४२ धावांची आघाडी घेतली आहे.

बर्न्स आणि हमीदची अर्धशतकं

पहिल्याच दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताला ७८ धावांवर सर्वबाद केल्यानंतर इंग्लंडकडून रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद ही सलामीची जोडी मैदानात उतरली. या दोघांनीही सुरुवातीची षटके सावध खेळून काढली. त्यामुळे दुसरे सत्र संपेपर्यंत इंग्लंडने ७ षटकात बिनबाद २१ धावा केल्या.

त्यानंतरही तिसऱ्या सत्रात त्यांनी त्यांचा चांगला खेळ कायम ठेवला. भारतीय संघाने इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा अशा सर्व पाच गोलंदाजांचे पर्याय वापरले. मात्र, एकाही गोलंदाजाला इंग्लंडची सलामी जोडी तोडता आली नाही. बर्न्स आणि हमीदने तिसरे सत्र पूर्ण खेळून काढताना वैयक्तिक अर्धशतकंही झळकावली. तसेच इंग्लंडला आघाडीही मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाखेर बर्न्स १२५ चेंडूत ५२ धावांवर नाबाद आहे. तसेच हमीद १३० चेंडूत ६० धावांवर नाबाद आहे.

भारतीय संघ ७८ धावांवर सर्वबाद

या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात फलंदाजांची ढिसाळ कामगिरी राहिली आहे. भारताचा पहिला डाव ४०.४ षटकात ७८ धावांवर संपुष्टात आला.

भारताकडून रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. रोहितने १९ धावा केल्या, तर रहाणेने १८ धावा केल्या. अन्य कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर, सॅम करन आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

भारतीय फलंदाजी कोलमडली

पहिल्या सत्रात ४ विकेट्स गमावल्यानंतरही दुसऱ्या सत्रातही भारतीय फलंदाजांची कामगिरी फारशी बरी राहिली नाही. एका बाजूने रोहित शर्माने एक बाजू सांभाळलेली असताना दुसऱ्या बाजूने विकेट जात होत्या. रिषभ पंतनेही ३० व्या षटकात ऑली रॉबिन्सनविरुद्ध खेळताना बटलरकडे झेल देत २ धावांवर विकेट गमावली. बटलरचा या डावातील ५ वा झेल ठरला.

त्यानंतर ३७ व्या षटकात चौथ्या चेंडूवर रोहित शर्मानेही १९ धावांवर क्रेग ओव्हरटनच्या गोलंदाजीविरुद्ध विकेट गमावली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीलाही शुन्यावर ओव्हरटनने बाद करत भारताला ७ वा धक्का दिला. त्या पुढच्याच षटकात सॅम करनने सलग दोन चेंडूत रविंद्र जडेजा(४) आणि जसप्रीत बुमराह(०) यांना पायचीत केले. अखेर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण ४१ व्या षटकात ओव्हरटनने सिराजला ३ धावांवर बाद करत भारताचा डाव ७८ धावांवर संपुष्टात आणला. इशांत ८ धावांवर नाबाद राहिला.

अँडरसनचा कहर

या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारतीय फलंदाज विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र, भारताला पहिला धक्का लवकर बसला. भारताचा सलामीवीर केएल राहुल पहिल्या षटकात ५ व्या चेंडूवर जेम्स अँडरसन विरुद्ध खेळताना यष्टीरक्षक जॉस बटलरकडे झेल देत बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला पहिल्याच षटकात सलामीवीर रोहित शर्माला साथ देण्यासाठी मैदानात उतरावे लागले.

मात्र, तोही फारकाळ टिकला नाही. पुजारालाही अँडरसनने ५ व्या षटकात जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे पुजारा १ धाव करुन माघारी परतला. त्यामुळे कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. पण, विराटलाही फार वेळ अँडरसनने मैदानावर टिकून दिले नाही. विराट १७ चेंडूत ७ धावा करुन ११ व्या षटकात बटलरकडेच झेल देऊन बाद झाला.

यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहित शर्माला चांगली साथ दिली होती. या दोघांनी चांगली भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच ऑली रॉबिन्सनने २६ व्या षटकात रहाणेला बटरलकडेच झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे रहाणे १८ धावा करुन माघारी परतला. त्याबरोबरच पहिल्या दिवसाचे पहिले सत्रही संपवण्यात आले.

पहिल्या सत्राखेर भारताने ४ बाद ५६ धावा केल्या. रोहित शर्मा १५ धावांवर नाबाद आहे.

इंग्लंड संघात बदल
या सामन्यासाठी इंग्लंड संघामध्ये तीन बदल करण्यात आले. मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मलान व अष्टपैलू क्रेग ओव्हरटन यांना संधी देण्यात आली. दुखापतग्रस्त मार्क वूड व सलामीवीर डॉम सिब्ली यांना संघाबाहेर जावे लागले. दुसरीकडे लॉर्ड्स कसोटीतील विजयी भारतीय संघात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
रॉरी बर्न्स, हसिब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर ओली रॉबिन्सन, मोईन अली, सॅम करन, क्रेग ओव्हरटन व जेम्स अँडरसन

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व इशांत शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटर मंधाना आहे कसोटी क्रिकेटची चाहती, पाहायला आवडते कोहली-अँडरसनमधील वैर

मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर अश्विन, विराट देईना संधी

लॉर्ड्स कसोटी जिंकत WTC गुणतालिकेत भारताचे वर्चस्व, अव्वलस्थानी केला ताबा; इंग्लंड संघ मात्र घसरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---