आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१२ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) भिडले. हा सामना मुंबईने १८ धावांनी गमावला. या सामन्याचे आर अश्विनने विस्ताराने विश्वेषण केले आहे. त्याने धावांचा पाठलाग करताना महत्वाच्या टप्प्यांवर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अश्विनच्या या महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे रजत पाटीदारविरुद्ध फिरकी गोलंदाज मंयक मार्कंडेला लवकर गोलंदाजीसाठी आणणे हा निर्णय. तेव्हा रजत चांगलाच फॉर्ममध्ये होता आणि त्याने मंयकविरुद्धही त्याचे वर्चस्व कायम राखले आणि सामन्याची दिशा वळवली. त्या १२ व्या षटकात रजतने लागोपाठ तीन षटकार मारले. त्याने २० चेंडूत ५३ धावा केल्या.
याबाबत अश्विनने २०२४ च्या एसआरएच (सनरायझर्स हैद्राबाद) विरुद्ध आरसीबीच्या धावफलकाचे उदाहरण दिले. तो म्हणाला, “हा धावफलक आजचा नाही, हा २०२४ च्या एसआरएच विरुद्ध आरसीबीचा आहे. त्यामध्ये रजतने सांगितले होते की तो एक स्पिन-हीटर फलंदाज आहे. त्याने या सामन्यातही फिरकीविरुद्ध फटकेबाजी केली. त्याने मयंकला मैदानावर सर्वत्र फटके मारले.” यावरून रजतने त्याचे फिरकीविरुद्ध पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आणि हे त्याने २०२४ मध्येच सांगितले होते.
अश्विन त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला, “रजत फिरकी गोलंदाजीविरुद्ध स्फोटक फलंदाजी करतो. तो फलंदाजीला आल्यावर तुम्ही थेट मार्कंडेला गोलंदाजीसाठी आणले आणि कर्णधार म्हणून हा खूपच सामान्य निर्णय आहे. मार्कंडेच्या २ षटकात ४० धावा गेल्या.”
एमआयच्या रणनीतीमुळे रजत लवकरच क्रिजवर स्थिरावला. त्याने लय पकडली आणि १७ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे फिल सॉल्ट आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर संघाचे अधिक नुकसान झाले नाही. रजतच्या फलंदाजीमुळे आरसीबीचा धावफलक हलताच राहिला.
या सामन्यात सॉल्टने ३६ चेंडूत ७८ धावा आणि विराटने ३८ चेंडूत ५० धावा केल्या. दोघांनी सलामीसाठी १२० धावांची भागीदारी केली. त्यामुळे आरसीबीने २० षटकात ४ विकेट्स गमावत २४० धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात मुंबईकडून रायन रिकल्टन आणि हार्दिकने संघाचे आव्हान जिंवत ठेवण्याचा प्रयत्न केला. रायन ३७ धावा आणि हार्दिक ४० धावा करत बाद झाले.
शेवटच्या षटकात शेरफेन रदरफोर्डने झटपट खेळी केली. तो ३१ चेंडूत ७१ धावा करत नाबाद राहिला. त्यामुळे मुंबईचा धावफलक २० षटकानंतर ५ बाद २२२ असा राहिला. हा सामना मुंबईने १८ धावांंनी गमावला.




