भारत आणि इंग्लंड संघात नुकताच एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. या विजयात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबर याच सामन्यात चौथ्या डावात भारतासमोर तब्बल ४२० धावांचे आव्हान असताना आणि एका बाजून अनुभवी फलंदाज बाद होत असताना विराट कोहलीने अर्धशतक करत तो फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे पुन्हा एकदा फॅब फोरची कामगिरी ही चर्चा सुरु झाली.
सध्याच्या काळात क्रिकेटमध्ये केन विलियम्सन, विराट कोहली, जो रुट आणि स्टिव्ह स्मिथ या फलंदाजांना फॅब फोर म्हणून ओळखले जाते. हे चौघेही साधारण सारख्याच वयाचे असून त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही जवळपास एकाच काळात झाले आहे. तसेच या चौघांनीही गेल्या काही वर्षात त्यांच्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर चौघांनीही आपल्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे.
त्यातही सध्या हे चौघेही वनडे, टी२० बरोबरच कसोटी क्रिकेटमध्येही वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. हे चौघेही कसोटी क्रमवारीत सध्या पहिल्या ५ मध्ये आहेत. त्यामुळे बऱ्याचदा या चौघांची तुलना होत असते. आजही या लेखात आपण या चौघांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांतील केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊ.
चौथ्या डावातील फॅब फोरची कामगिरी –
विराट कोहली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी कसोटीतील चौथ्या डावांत उल्लेखनीय राहिली आहे. भारतीय संघाची ‘रनमशीन’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या विराटने आत्तापर्यंत २४ वेळा कसोटीच्या चौथ्या डावात फलंदाजी केली आहे. यावेळी त्याने ५०.९४ च्या सरासरीने एकूण ९६८ धावा केल्या असून यात २ शतकांचा आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. १४१ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
जो रुट – इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट याने मागील काही दिवसांत केलेल्या कामगिरीमुळे सर्वांकडूनच वाहवा मिळवली आहे. तो फॅब फोरमधील ८००० कसोटी धावा पूर्ण करणारा आणि १०० कसोटी खेळणारा पहिला खेळाडू आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३० वेळा चौथ्या डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने ३२.९२ च्या सरासरीने ८२३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची ८७ धावा ही चौथ्या डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा कसोटीमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. सुरुवातील अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात दाखल झालेल्या स्मिथने पुढे त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. आज तो सर्वोत्तम कसोटीपटूंमध्ये गणला जातो. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २२ वेळा चौथ्या डावात फलंदाजी केली आहे. मात्र, त्याची चौथ्या डावातील आकडेवारी फॅब फोरमधील बाकींच्यांपेक्षा फार खास नाही. त्याने २२ डावात ३०.७३ च्या सरासरीने ५८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. ९७ धावा ही त्याची चौथ्या डावातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
केन विलियम्सन – न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने गेल्या काही महिन्यात कसोटीमध्ये उत्तम प्रदर्शन केले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत १९ वेळा कसोटीच्या चौथ्या डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यात त्याने ४९.१४ च्या सरासरीने ६८८ धावा केल्या असून यात ३ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. १०८ धावा ही त्याची चौथ्या डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच फॅब फोरमध्ये चौथ्या डावात सर्वोत्तम सरासरीच्या बाबतीत तो विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन मैदानात होता; वानखेडेवर इतिहास घडत होता, तरीही जगात कुणालाच याची साधी खबरसुद्धा नव्हती…
गिल, रहाणेला एकाच षटकात बोल्ड केल्याबद्दल अँडरसनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…