---Advertisement---

लाजवाब! फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

दिल्ली। बुधवारी (२८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्याक चेन्नईच्या विजयात अर्धशतकी खेळी करणाऱ्या फाफ डू प्लेसिसचा मोठा वाटा राहिला. डू प्लेसिसने केवळ फलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही कमाल केली. त्याने या सामन्यात घेतलेल्या एका झेलाचे बरेच कौतुक झाले.

फाफ डू प्लेसिसने घेतला अप्रतिम झेल
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने उत्तम फलंदाजी करत वैयक्तिक अर्धशतके करत शतकी भागीदारीही रचली. मात्र त्या दोघांनाही १८ व्या षटकात लुंगी एन्गिडीने बाद केले. वॉर्नरचा ५७ धावांवर रविंद्र जडेजाने झेल घेतला. तर पांडेचा अफलातून झेल फाफ डू प्लेसिसने घेतला. त्यामुळे पांडेला ६१ धावांवर बाद व्हावे लागले.

पांडेने १८ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर लाँग ऑनला मोठा फटका मारला होता. तो चेंडू षटकारासाठीच जाईल असे वाटत असतानाच फाफ डू प्लेसिसने उजवीकडे पळत येत हवेत स्वत:ला पूर्णपणे झोकून देत दोन्ही हातांनी झेल पकडला. त्याचा हा झेल पाहून अनेकांनी त्याची वाहवा केली असून, काहींनी या हंगामातील हा सर्वोत्तम झेल असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/Henry64Ian/status/1387430189605531653

चेन्नईने मिळवला विजय 
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १८.३ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला. चेन्नईकडून सलामीला फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने १२९ धावांची भागीदारी करत विजयाचा भक्कम पाया रचला.

फाफ डू प्लेसिसने ३८ चेंडूत ५६ धावा केल्या. या खेळीत फाफ डू प्लेसिसने ६ चौकार आणि १ षटकार मारला. तसेच ऋतुराजने ४४ चेंडूत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. त्यांच्यानंतर अखेर सुरेश रैना आणि रविंद्र जडेजाने उर्वरित आव्हान पूर्ण करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रैना १७ धावांवर आणि जडेजा ७ धावांवर नाबाद राहिला. तसेच मोईन अलीने १५ धावांचे योगदान दिले.

हैदराबादकडून केवळ राशिद खानलाच विकेट्स घेण्यात यश आले. चेन्नईच्या सर्व ३ विकेट्स त्यानेच घेतल्या.

तत्पूर्वी, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १७१ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने अर्धशतकी खेळी केली. पांडेने ४६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ६१ धावांची खेळी केली. तर वॉर्नरने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या. तसेच केन विलियम्सनने १० चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी केली. तर केदार जाधवने ४ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या.

चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर सॅम करनने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनंतर फाफ डू प्लेसिसने केला ‘तो’ खास विक्रम

आरपी सिंगने सोडला आयपीएलचा बायोबबल, धक्कादायक कारण आले समोर

CSK vs SRH: ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईचा हैदराबादवर ७ विकेट्सने मोठा विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---