IPLक्रिकेटटॉप बातम्या

भारतात क्रिकेट म्हणजे धर्म! चाहत्यानं केली हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना अनेकदा चक्क देवाचा दर्जा देतात. असंच काहीसं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. सोशल मीडयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक क्रिकेट चाहता टीव्हीसमोर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती करताना दिसत आहे.

अलीकडच्या काळात जगभरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता बनवल्यानंतर पॅट कमिन्सनं कांगारूंना सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. सध्या कमिन्स आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्व करत आहे.

 

आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात मंगळवारी सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना नितीश रेड्डी (64) याच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावाच करता आल्या. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑरेंज आर्मीनं चालू हंगामामध्ये तिसरा विजय नोंदवला आहे.

जर आपण आयपीएल 2024 च्या गुणतालिकेकडे लक्ष दिलं तर, सनरायझर्स हैदराबाद संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आणि दोन गमावले आहेत. त्याचबरोबर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ 5 सामन्यांत दोन विजय आणि तीन पराभवांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या या हंगामात राजस्थान रॉयल्स हा एकमेव संघ आहे ज्यानं आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. चार सामन्यांत चार विजय मिळवून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघ 4 सामन्यात तीन विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ सुपरजायंट्सनेही चार सामन्यांत तीन विजय नोंदवले आहेत, परंतु ते धावगतीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं 5 सामन्यात तीन विजय मिळवत चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल 2024 मधील सर्वात महागडे गोलंदाज, दोघांनी दिल्या 200 हून अधिक धावा; दिग्गज राशिद खानचाही यादीत समावेश

भुवनेश्वर कुमारनं रचला इतिहास, अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

बापरे! ताशी 140 किमी वेगाच्या चेंडूवर यष्टीचीत केलं! हेनरिक क्लासेनची आश्चर्यकारक कामगिरी

Related Articles