इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रातील 12 व्या सामन्यात सोमवार (19 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी विजय मिळवला. या सत्रातील सीएसके संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या सीएसकेने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला राजस्थानचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावा करू शकला आणि सीएसकेने सामना खिशात घातला.
परंतु या सामन्यातसुद्धा सीएसकेचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. यामुळे चाहत्यांनी त्याच्याजागी रॉबिन उथप्पाला सीएसके संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
गेल्या आयपीएल हंगामामध्ये सीएसके संघातून उत्कृष्ट कामगिरी केलेला मराठमोळा गायकवाड यावेळी सलग तिसर्या सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर टीका केली असून त्याच्याऐवजी उथप्पाला सीएसके संघात स्थान देण्याची मागणी केली आहे.
यंदाच्या मोसमात गायकवाड उत्तम कामगिरी करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. राजस्थानविरुद्धचा सामना हा त्याचा या हंगामातील तिसरा सामना होता. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात त्याने 6.66 च्या सरासरीने अवघ्या 20 धावा केल्या आहेत. पहिल्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध त्याने 8 चेंडूत 5 धावा केल्या. नतंर पंजाब किंग्जविरुद्धही 16 चेंडूत 5 धावा करून तो बाद झाला आणि त्यानंतर राजस्थानविरूद्ध त्याने 13 चेंडूत 10 धावा केल्याने चाहत्यांनी त्याच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे उथप्पाला अजून सीएसके संघातकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल 2020 मध्ये त्याने 12 सामन्यात 196 धावा केल्या होत्या. दरम्यान 41 धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर विजय’; दिल्ली-मुंबईला पछाडत धोनीच्या पलटणचा गुणतालिकेत ‘या’ स्थानी ताबा
‘माझ्यामुळे संघावर पराभवाची नामुष्की ओढावली असती,’ विजयानंतर कॅप्टन धोनीने मान्य केली आपली चूक