१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तुफानी खेळी करताना शतकी खेळी देखील केल्या आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी त्याचे शतक हे नेहमीच खास असते. पण काही शतके अशी असतात जी अविस्मरणीय ठरतात. त्यातही ते शतक जर कमीत कमी चेंडूत केले असेल तर ते आणखी खास ठरते.
या लेखातही आपण भारताकडून वनडेत सर्वात जलद शतके करणाऱ्या ५ खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.
वनडेत सर्वात जलद शतक करणारे क्रिकेटपटू –
५. युवराज सिंग – ६४ चेंडू
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३०४ सामने खेळताना १४ शतके केली आहेत. यातील १४ नोव्हेंबर २००८ केलेले शतक त्याच्यासाठी खास ठरले होते. त्याने इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे खेळताना ७८ चेंडूत नाबाद १३८ धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याने केवळ ६४ चेंडूत शतक केले होते. हे भारताकडून केलेले पाचव्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक आहे.
त्या सामन्यात भारताने युवराजने केलेल्या शतकी खेळच्या जोरावर आणि गंभीर व सेहवागने केलेल्या अर्धशतकांच्या मदतीने ५ बाद ३८७ धावा करत इंग्लंडला ३८८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २२९ धावाच करता आल्यामुळे भारताने हा सामना तब्बल १५८ धावांनी जिंकला.
४. मोहम्मद अझरुद्दीन – ६२ चेंडू
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनदेखील सर्वात जलद वनडे शतके करणाऱ्या भारतीयांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये आहे. त्याने १७ डिसेंबर १९८८ ला बडोदा येथे न्यूझीलंड विरुद्धच्या वनडेत २७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १० चौकार आणि ३ षटकारांसह ६५ चेंडूत नाबाद १०८ धावांची खेळी केली होती आणि भारताला २ विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
त्यावेळी त्याने ६२ चेंडूत शतकाला गवसणी घातली होती. त्यामुळे त्यावेळी तो भारताचा वनडेत सर्वात जलद शतक करणारा फलंदाज होता. हा विक्रम पुढे २० वर्षे त्याच्याच नावावर होता. अझरुद्दीनने त्याच्या कारकिर्दीत ३३४ वनडे सामने खेळताना ७ शतकांसह ९ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
३. विराट कोहली – ६१ चेंडू
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आत्तापर्यंत अनेक मोठ-मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याच्या अनेक खेळी चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरल्यात. त्यातीलच एक खेळी म्हणजे ३० ऑक्टोबर २०१३ ला नागपूरला त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६६ चेंडूत केलेली ११५ धावांची खेळी. ही खेळी त्याने ३५१ धावांचा पाठलाग करत असताना केली होती. या खेळीत त्याने एकूण १८ चौकार आणि १ षटकार मारले होते.
तसेच ही खेळी करताना त्याने ६१ चेंडूत शतकाला गवसणी घातली होती. त्यामुळे विराटने केलेले हे शतक भारताकडून केलेले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक आहे. त्या सामन्यात विराटने शिखर धवनबरोबर ५६ धावांची भागीदारी केली होती. शिखरनेही या सामन्यात १०० धावा केल्या होत्या. तसेच विराटने शेवटच्या काही षटकात एमएस धोनीसह ६१ धावांची नाबाद भागीदारी केली होती.
त्यावेळी विराट आणि शिखरच्या शतकांच्या मदतीने भारताने ३५१ धावांचे आव्हान शेवटच्या षटकात पार करत सामना जिंकला होता.
२. विरेंद्र सेहवाग – ६० चेंडू
भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने आत्तापर्यंत अनेक मोठ्या आणि वादळी खेळी वनडेत केल्या आहेत. यात एका द्विशतकाचाही समावेश आहे. पण त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान वनडे शतक ११ मार्च २००९ ला न्यूझीलंड विरुद्ध केले होते. पावसाचा व्यत्यय आलेल्या त्या सामन्यात सेहवागने ६० चेंडूत शतकाला गवसणी घातली होती.
त्यावेळी त्याने भारताकडून वनडेत सर्वात जलद शतक करण्याचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रमही मोडला होता. त्यामुळे तो भारताचा वनडेत सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला होता. हा विक्रम पुढे ४ वर्षे टिकला.
सेहवागने त्या सामन्यात ७४ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १२५ धावा केल्या होत्या. तसेच गंभीरने नाबाद ६३ धावा केल्या होत्या. भारत बिनबाद २०१ धावांवर असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे भारताला या सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार विजेते घोषित करण्यात आले. त्याआधी न्यूझीलंड प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकात ५ बाद २७० धावा केल्या होत्या.
१. विराट कोहली – ५२ चेंडू
रनमशिन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने आत्तापर्यंत २४८ वनडे सामन्यात खेळताना ४३ शतकांसह ११ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पण त्यातील १६ ऑक्टोबर २०१३ ला जयपूर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने केलेले शतक खास ठरले होते.
त्याने त्या सामन्यात ५२ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या होत्या. त्यामुळे तो भारताकडून सर्वात जलद वनडे शतक करणारा खेळाडू ठरला होता. त्याने सेहवागचा ४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला होता. विराटचा सर्वात जलद वनडे शतकाचा हा विक्रम अजूनही कोणत्या भारतीय खेळाडूला मोडता आलेला नाही.
त्याने ५२ चेंडूत केलेल्या शतकी खेळीदरम्यान ८ चौकार आणि ७ षटकार मारले होते. तसेच त्याने त्या सामन्यात नाबाद १४१ धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्मासह १८६ धावांची नाबाद भागीदारी केली होती. तसेच त्या सामन्यात शिखरनेही ९५ धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट, रोहितच्या शतकाच्या आणि शिखरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ३६२ धावा करत ऑस्ट्रेलियाचे ३६० धावांचे आव्हान सहज पार केले होते.
ट्रेंडिंग लेख –
थेट विश्वचषकातूनच टी-20 कारकिर्दीला सुरुवात करणारे भारतीय खेळाडू
अविवाहित, नवविवाहित व पिता असताना धोनीने जिंकल्या आहेत ३ आयपीएल ट्राॅफी
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ५ फलंदाज