महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2024) काल (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. यासह आरसीबीनं पहिल्यांदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबीच्या पुरुष किंवा महिला संघानं कोणतीही ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा विजय ऐतिहासिक ठरतो.
आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. चाहते मोठ्या संख्येनं संघाला शुभेच्छा देत आहेत. बंगळुरूची टीम जगभरातील तिच्या चाहत्यावर्गासाठी ओळखली जाते. संघानं 17 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नसली तरी चाहते मात्र संघाला तेवढ्याच उत्साहानं सपोर्ट करतात. याचीच प्रचिती कालच्या विजयानंतर आली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं WPL 2024 जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक रेकॉर्ड बनवला आहे. आरसीबीच्या महिला टीमचा ट्रॉफी उचलतानाचा फोटो इंस्टाग्रामवर सर्वात जलद 10 लाख लाईक्स मिळवणारा फोटो बनला. संघाच्या सोशल मीडिया हॅन्डलनं हा फोटो इंस्टाग्रामवर टाकताच त्याला अवघ्या 9 मिनिटांत 10 लाख लाईक्स मिळाल्या. यापूर्वीचा रेकॉर्ड आरसीबीचाच खेळाडू विराट कोहलीच्या नावे होता. त्याच्या फोटोला 10 मिनिटांत 10 लाख लाईक्स मिळाल्या होत्या.
Fastest to 1M likes in India on Instagram:
RCB – 9 mins.
Virat Kohli – 10 mins.
Elvish Yadav – 11 mins.
Virat Kohli – 12 mins.
Virat Kohli – 12 mins.
Virat Kohli – 13 mins.
Virat Kohli – 14 mins. pic.twitter.com/JpeAz1dBXR— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 18, 2024
अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्सनचा संघ प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात सर्वबाद 113 धावा करू शकला. शेफाली वर्मानं 27 चेंडूत सर्वाधिक 44 धावा ठोकल्या. तर कर्णधार लॅनिंगनं 23 चेंडूत 23 धावांचं योगदान दिलं. आरसीबीकडून मराठमोळ्या श्रेयंका पाटीलनं 12 धावा देऊन 4 बळी घेतले. तर सोफी मोलिनेक्सनं 20 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
दिल्ली कॅपिटल्सनं दिलेलं 114 धावांचं आव्हान आरसीबीनं लीलया गाठलं. सोफी डिव्हाईन आणि स्मृती मानधना या जोडीनं सावध सुरुवात करून दिली. स्मृतीनं 39 चेंडूत 31 तर सोफीनं 27 चेंडूत 32 धावा केल्या. एलिस पेरी (37 चेंडूत 35 धावा) आणि रिचा घोष (14 चेंडूत 17 धावा) नाबाद राहिल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखा पांडे आणि मिन्नू मनी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. सोफी मोलिनेक्सला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा खिताब मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर कर्णधार मेग लॅनिंगला अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ
आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमध्ये चाहत्यांचे जोरदार सेलिब्रेशन अन् रस्ते जाम, पाहा व्हिडिओ