---Advertisement---

आयएसएल २०२०: जमशेदपूरविरुद्ध गोव्याचा महत्त्वाचा विजय

---Advertisement---

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी एफसी गोवा संघाने जमशेदपूर एफसीवर 3-0 असा सफाईदार विजय मिळविला. बाद फेरीच्या दृष्टिने गोव्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरेल. जोर्गे मेंडोझाने दोन गोल करीत विजयात बहुमोल वाटा उचलला.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्य फळीतील स्पेनचा 28 वर्षीय खेळाडू जोर्गे मेंडोझा याने गोव्याचे खाते 19व्या मिनिटाला उघडले. मग 52व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल केला. एक मिनिट बाकी असताना बचाव फळीतील स्पेनचा 30 वर्षीय खेळाडू इव्हान गोंझालेझ याने संघाचा तिसरा गोल केला.

गोव्याने 11 सामन्यांत पाचवा विजय नोंदविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण झाले. हैदराबाद एफसीला मागे टाकून गोव्याने तिसरा क्रमांक गाठला. हैदराबादचे 10 सामन्यांतून चार विजयांसह 15 गुण आहेत. या लढतीआधी गोवा आणि हैदराबाद यांचे प्रत्येकी 15 गुण होते. दोन्ही संघांचा गोलफरकही दोन असा समान होता. त्यात हैदराबादचे दोन गोल जास्त होते. अर्थात हैदराबादचा एक सामना कमी झाला आहे.

स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याला मागील लढतीत एससी ईस्ट बंगालविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. याआधीच्या चार लढतींत त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळविता आले नव्हते. त्यामुळे हा निकाल त्यांच्या आक्रमक शैलीला साजेसा आणि चाहत्यांसाठी स्वागतार्ह ठरला.

इंग्लंडच्या ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या जमशेदपूरसाठी बाद फेरीच्यादृष्टिने हा निकाल प्रतिकूल ठरला. 11 सामन्यांत त्यांना चौथा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण कायम राहिले, मात्र मोठ्या फरकाने हरल्यामुळे गुणतक्त्यात त्यांची एक क्रमांक खाली घसरण झाली. आता त्यांचा सातवा क्रमांक आहे. बेंगळुरू एफसीने सरस गोलफरकावर जमशेदपूरला मागे टाकले. बेंगळुरूचा गोलफरक उणे 1 (13-14), तर जमशेदपूरचा उणे 3 (12-15) असा आहे.

मुंबई सिटी एफसी 10 सामन्यांतून आठ विजयांसह 25 गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 10 सामन्यांत सहा विजयांसह त्यांचे 20 गुण आहेत.

खाते उघडण्याची शर्यत गोव्याने जिंकली. मध्य फळीतील अल्बर्टो नोग्युरा याने ही चाल रचली. त्याने बॉक्सच्या उजव्या बाजूला चेंडूवर ताबा मिळविला. त्यावेळी जमशेदपूरचा बचावपटू रिकी लल्लावमाव्मा त्याला रोखू शकला नाही. रिकी तोल जाऊन मैदानावर पडला. तोपर्यंत नोग्युलाने बॉक्समध्ये प्रवेश करीत जोर्गेला पास दिला. त्यावेळी बॉक्सच्या मध्यभागी असलेल्या जोर्गेने मुसंडी मारली आणि ताकदवान फटका मारला. जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याने उजवीकडे झेप टाकली, पण तो जोर्गेचा फटका अडवू शकला नाही.

एका गोलची आघाडी गोव्याने मध्यंतरास राखली. दुसऱ्या सत्रात जोर्गेनेच यात भर घातली. मध्य फळीतील ब्रँडन फर्नांडीस याने रचलेल्या चालीवर जोर्गेने गोल केला. निर्धारीत वेळ संपण्यास एकच मिनिट बाकी असताना नोग्युराच्याच पासवर गोंझालेझने गोल केला. त्यामुळे गोव्याचा दणदणीत विजय साकार झाला.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : ओदिशाला हरवून चेन्नईयीनची आगेकूच

आयएसएल २०२०-२१ : ओगबेचेच्या गोलमुळे मुंबई सिटीचा एटीके मोहन बागानला शह

आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडची बेंगळुरूविरुद्ध लढत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---