गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बाद फेरीतील चौथा संघ रविवारी निश्चीत झाला. एफसी गोवा संघाने हैदराबाद एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधत ही कामगिरी केली. संपूर्ण मोसमात आक्रमक खेळ करणाऱ्या गोव्याने हैदराबादची दमदार आक्रमणे फोल ठरविली. बरोबरीच्या एका गुणासह चौथा क्रमांक कायम राखत गोव्याने आगेकूच केली.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास उभय संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली.
या लढतीआधी गोव्याचे 30, तर हैदराबादचे 28 गुण होते. बाद फेरीसाठी गोव्याला बरोबरी, तर हैदराबादला विजय अनिवार्य होता. मात्र अखेरीस दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. गोव्याची 20 सामन्यांतील ही दहावी बरोबरी असून सात विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 31 गुण झाले. त्यांचा चौथा क्रमांक कायम राहिला. हैदराबादला 20 सामन्यांत 11वी बरोबरी साधावी लागली. सहा विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 29 गुण झाले. त्यांचा बाद फेरीतील प्रवेश थोडक्यात हुकला असला तरी दुसऱ्याच मोसमातील पाचवा क्रमांक त्यांच्यासाठी उल्लेखनीय ठरला.
तिसऱ्या मिनिटाला हैदराबादचा मध्यरक्षक महंमद यासीर याने उजवीकडून आगेकूच केली. त्याने गोलक्षेत्रात मुसंडी मारली. तो स्ट्रायकर जोएल चायनेस याला पास देण्यापूर्वीच गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझ यांनी ही चाल फोल ठरविली.
सहाव्या मिनिटाला हैदराबादला उजवीकडे मिळालेली फ्री किक मध्यरक्षक हालीचण निर्झारी याने घेतली, पण ही चाल वाया गेली. मध्यरक्षक सौविक चक्रवर्ती चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही.
सामन्याच्या 19व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक रोमारीओ जेसुराज याने डावीकडून आगेकूच करीत बचावपटू सेव्हीयर गामा याला पास दिला. गामा घोडदौड करताच हैदराबादचा मध्यरक्षक निखील पुजारी याने पाठलाग सुरु केला. त्यामुळे गामाला चेंडू बाहेर मारणे भाग पडले.
सामन्याच्या 22व्या मिनिटाला हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्रा याने उजवीकडून मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने नर्जारीला पास देण्याचा प्रयत्न केला, पण गोंझालेझने चेंडू ब्लॉक केला.
सामन्याच्या 40व्या मिनिटाला हैदराबादचा स्ट्रायकर फ्रान सँडाझा याने उजवीकडून आगेकूच केली. त्याने यासीरच्या दिशेने चेंडू मारला. गामाने मैदानावर घसरत चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. त्यानंतर यासीरच्या दिशेने चेंडू गेला. त्यावेळी गोव्याचा बचावपटू आदील खान याने दडपण आणले. त्याचवेळी गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंग पुढे सरसावला. त्याने चेंडूवर ताबा मिळविला.
सामन्याच्या 83व्या मिनिटाला जोएल तायनेस याने मुसंडी मारली, पण गोव्याच्या आदील खान याने त्याला रोखले. त्यावेळी चेंडू हैदराबादचा बदली मध्यरक्षक साहील तवोरा याला मिळाला. त्याने नेटच्या दिशेने फटका मारला, पण तो स्वैर होता.
यानंतर सामन्याच्या 85व्या मिनिटाला हैदराबादचा बदली स्ट्रायकर लिस्टन कुलासो याने नर्झारीला अप्रतिम पास दिला. नर्झारीने चांगला प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती.
सामन्याच्या अंतिम टप्प्यात अखिलाडू वर्तनाचे गालबोट लागले. 86व्या मिनिटाला लुईस सॅस्त्रे याने एफसी गोवा संघाच्या बेंचच्या दिशेने बाटली फेकली. त्यामुळे त्याला रेड कार्ड दाखविण्यात आले. दुसरीकडे अल्बर्टो नोग्युरा याने प्रत्युत्तर म्हणून अखिलाडू वर्तन केले. त्यामुळे त्याला दुसऱ्या यलो कार्डलार सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीसाठी आनंदाची गोष्ट! ‘या’ खेळाडूने ठोकलंय सलग तिसरं शतक, ५ सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा
विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट
भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद