आंतरराष्ट्रीय फुटबॉलची सर्वात मोठी संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेले निलंबन रद्द केले आहे. दहा दिवसांनंतर भारतीय फुटबॉलला मोठा दिलासा देत फिफाने तात्काळ प्रभावाने निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासोबतच ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेलाही फिफाने हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त करत फिफाने १६ ऑगस्ट रोजी एआयएफएफला निलंबित केले होते.
FIFA lifts suspension on AIFF
Read More 👉https://t.co/nyN1xgFdBf
— Indian Football Team (@IndianFootball) August 26, 2022
फिफाने शुक्रवारी निलंबन मागे घेत असल्याची माहिती देणारे अधिकृत निवेदन जारी केले. फिफाच्या प्रसिद्धीपत्रकात फिफाने 22 ऑगस्टच्या निर्णयाचा हवाला देत म्हटले आहे की, “या परिस्थितीत, कौन्सिल ब्युरोने २५ ऑगस्टपासून एआयएफएफचे निलंबन तात्काळ समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, महिला अंडर १७ विश्वचषक ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ दरम्यान भारतात होणार आहे.
एआयएफएफमधील भ्रष्टाचार तसेच अनियमिततेमुळे सुप्रीम कोर्टाने एआयएफएफच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फिफाने तात्काळ कारवाई करत संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. कारभार पुन्हा एकदा सुरळीत होण्याचा विश्वास झाल्यानंतर ही बंदी उठवण्याची माहिती फिफाने दिली होती. महासंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता फिफाने आपला शब्द पाळला आहे.