भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज लाखोंमध्ये देशात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात वैद्यकिय सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना वैद्यकिय सेवांअभावी जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत अनेक संस्था, सेलिब्रेटी, खेळाडू, दिग्गज मान्यवर मदतीला धावून येत आहे. नुकतेच क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत मानले जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) मोठी मदत जाहीर केली आहे.
बीसीसीआयने आज (२४ मे) ट्विट करत जाहीर केले की ते १० लिटरचे २००० ऑक्सिजन संच (ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर्स) दान करणार आहेत, ज्यामुळे भारताला कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी मदत होईल. हे ऑक्सिजन संच येत्या काही महिन्यात संपूर्ण भारतात वितरित केले जातील, ज्यामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळेल.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण सिंग धूमाळ यांनी ऑक्सिजन संचाच्या दानामुळे काहीप्रमाणात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सहकार्य होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
BCCI to contribute 10-Litre 2000 Oxygen concentrators to boost India’s efforts in overcoming the COVID-19 pandemic.
More details here – https://t.co/XDiP374v8q #IndiaFightsCorona pic.twitter.com/BhfX8fwirH
— BCCI (@BCCI) May 24, 2021
मागीलवर्षीही बीसीसीआयची मदत
कोरोनाविरुद्धच्या लढाईत बीसीसीआयने मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मागीलवर्षी बीसीसीआयने तब्बल ५१ कोटी रुपये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी दान केले होते.
यापूर्वी क्रिकेट क्षेत्रातून मदतीचा हात
यापूर्वीदेखील अनेक क्रिकेटपटू यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच भारतीय खेळाडूंमध्येही अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा एक मोहिम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत ११ कोटीपेक्षा अधिक रकमेची मदत त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दान केली आहे. या मोहिमेसाठी त्यांनी २ कोटींचे दान दिले आहे. याच मोहिमेत युजवेंद्र चहलनेही योगदान दिले आहे. याशिवाय हार्दिक आणि कृणाल पंड्या यांनी २०० ऑक्सिजन संचांची मदत केली आहे.
तसेच रिषभ पंत, सचिन तेंडुलकर, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन अशा अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
एवढेच नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि एस्टोनिया क्रिकेट बोर्डांनींही भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान दिले आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद अशा आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
असा भारतीय क्रिकेटपटू, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…
पहिल्या ३ सामन्यात ३० विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक; मग सर्वांपुढे भारतीय संघाला केले लाजिरवाणे
‘सचिननेच मला खराब गोलंदाजी करायला लावली’, माजी पाकिस्तानी फिरकीपटूचा धक्कादायक उलगडा