लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सोमवारी (१६ ऑगस्ट) संपला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडला १५१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. तसेच ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-१ अशी पिछाडीही स्विकारावी लागली आहे. या पराभवामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रुटचे पहिल्या डावात केले शतक व्यर्थ ठरले. याशिवाय त्याच्या शतकाची आणि इंग्लंडच्या अपराजित राहण्याची एक साखळीही तुटली आहे.
रुटने या सामन्यात पहिल्या डावात नाबाद १८० धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात त्याने ३३ धावा केल्या. रुटचे कारकिर्दीतील हे २२ वे कसोटी शतक होते.
त्याने कसोटीत शतक केल्यानंतरही इंग्लंडला पराभव पत्करावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्याने यापूर्वी कसोटीत जेव्हाही शतक केले होते तेव्हा इंग्लंडने कधीही पराभव स्विकारलेला नव्हता. त्याने शतक केलेल्या यापूर्वीच्या २१ कसोटी सामन्यांपैकी १६ सामने इंग्लंडने जिंकले होते. तर ५ सामने अनिर्णित राहिले होते. मात्र, एकाही सामन्यात पराभव झालेला नव्हता. मात्र, त्याच्या २२ व्या कसोटी शतकावेळी इंग्लंडवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे.
यापूर्वी शेवटची अशा प्रकारची सर्वात लांब अपराजित शतकांची साखळी गॅरी सोबर्स यांची होती. त्यांच्या पहिल्या २० कसोटी शतकांवेळी वेस्ट इंडिज संघाने पराभव स्विकारला नव्हता.
तसेच सर्वाधिक अपराजित शतकं करण्याचा विक्रम ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २७ शतकं केली, त्यातील एकही कसोटी शतकावेळी त्याच्या संघाचा पराभव झाला नाही. तसेच त्याच्या पाठोपाठ या यादीत जेफ्री बॉयकॉट आणि वॅली हेमंड आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकी २२ शतकं केली, यातील एकही शतक पराभूत सामन्यात आलेले नाही.
सोमवारी भारताने इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान विजयासाठी ठेवले होते. मात्र, इंग्लंडला ५१.५ षटकात सर्वबाद १२० धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा मायदेशाबाहेर ‘या’ मैदानांवर राहिलाय दबदबा, इंग्लंडच्या लॉर्ड्सचाही समावेश
खट्याळ पंतसोबत खुद्द कर्णधारानेच केली मस्ती, भर मैदानात कानात अडकवलं ब्रेसलेट, पाहून खदखदून हसाल