गॉल। श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यासामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव ३५.५ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला. या डावात इंग्लंड फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली. श्रीलंकेचे सर्व १० विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम झाला आहे.
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडकडून डॉम बेस आणि जॅक लीचने प्रत्येकी ४ विकेट्स आणि कर्णधार जो रुटने २ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे हे तिघेही फिरकी गोलंदाज आहेत.
या सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची १० विकेट्स घेतल्या होत्या. यात जेम्स अँडरसनने सर्वाधिक ६, मार्क वूडने ४ आणि सॅम करनने १ विकेट घेतली होती.
त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की एकाच कसोटी सामन्यात एका संघाच्या वेगवान गोलंदाजांनी एका डावात सर्व १० विकेट्स आणि दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांनी सर्व १० विकेट्स घेतल्या आहेत. याआधी असे कधीही झाले नव्हते.
असाही एक विक्रम –
याबरोबर कसोटीमध्ये असे दुसऱ्यांदाच झाले की ज्या गोलंदाजांनी पहिल्या डावात मिळून १० विकेट्स घेतल्या. त्यातील कोणत्याच गोलंदाजांना दुसऱ्या डावात एकही विकेट मिळाली नाही. दुसऱ्या डावात वेगळ्या गोलंदाजांनी मिळून १० विकेट्स घेतल्या. याआधी असे द ओव्हल मैदानावर २०१९ साली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाले होते.
त्या सामन्यात इंग्लंडकडून पहिल्या डावात जोफ्रा आर्चर (६), सॅम करन(३) आणि ख्रिस वोक्सने (१) विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (४), जॅक लीच (४) आणि जो रुट (२) यांनी विकेट्स घेतल्या होत्या.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सामन्यात रंगत –
सध्या गॉलमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजच्या(११०) शतकी खेळीच्या आणि दिनेश चंडिमल(५२), निरोशान डिकवेल्ला(९२) आणि दिलरुवान परेरा(६२) यांच्या अर्धशतकांमुळे ३८१ धावांचा डोंगर उभारला. या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली, मात्र कर्णधार जो रुटने दिडशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने ३०९ चेंडूत १८६ धावा केल्या. त्याला ५५ धावा करत जोस बटलरने चांगली साथ दिली. मात्र तरीही इंग्लंडला ३७ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. इंग्लंडचा पहिला डाव ३४४ धावांवर संपुष्टात आला.
यानंतर मात्र, इंग्लंडच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी करताना श्रीलंकेला १२६ धावांवरच रोखले. त्यामुळे श्रीलंकेने ३७ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
याआव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सलामीवीर जॅक क्राऊले(१३) आणि जॉनी बेअरस्टोची(२९) विकेट गमावली आहे. या दोघांनाही लसिथ एम्बुलडेनियाने बाद केले. तसेच कर्णधार रुट देखील ११ धावांवर रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर बाद बाद झाला आहे. तर एम्बुडेनियाने डॅनिएल लॉरेन्सलाही बाद केले आहे. पण असे असले तरी इंग्लंडने २८ षटकांत १०० धावांचा आकडा पार केला आहे. २९ षटकात त्यांनी ४ बाद १०५ धावा केल्या असून त्यांना ५९ धावांची गरज आहे. तसेच मंगळवारी (२६ जानेवारी) या सामन्याचा शेवटचा दिवस आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ती’ घटना घडली अन् बाऊंसरची भीती पळाली, शुबमन गिलने केला खुलासा
“कर्णधार कोणीही असो, आमची इच्छा एकच..”, विराटच्या नेतृत्त्वाशी तुलना केल्याने रहाणेचे मोठे भाष्य