आयपीएल २०२१ मध्ये रविवारी (१८ एप्रिल) पहिल्यांदा डबल हेडर म्हणजे एकाच दिवशी दोन सामने खेळले जाणार आहे. यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात खेळला जात आहे. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, विराट कोहली आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने बाद झाला.
अशा पद्धतीने झाला विराट बाद
आरसीबीच्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने युवा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला आमंत्रित केले. षटकातील दुसरा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न विराट कोहलीने केला. मात्र, चेंडू व्यवस्थित बॅटवर न आल्याने डीप पॉईंटच्या दिशेने उडाला. पॉईंट क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या राहुल त्रिपाठीने वेगात मागे धावत जाऊन सूर मारत अप्रतिम झेल टिपला.
अशाप्रकारे विराट कोहली आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १९५ व्या सामन्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व न केलेल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर व एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला न खेळलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. वरूण चक्रवर्ती व राहुल त्रिपाठी यांनी भारतीय संघाचे अद्याप एकदाही प्रतिनिधित्व केले नाही.
आरसीबीची मोठी धावसंख्या
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार हे दुसऱ्या षटकात माघारी परतले. तिसऱ्या गड्यासाठी सलामीवीर देवदत्त पडिक्कल व ग्लेन मॅक्सवेल यांनी ८५ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने संघासाठी सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. एबी डिव्हिलियर्सच्या ३४ चेंडूतील ७६ धावांमुळे आरसीबीने ४ बाद २०४ धावा उभारल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल त्रिपाठीने पकडला विराटचा हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल? व्हिडिओ होतोय व्हायरल
‘तुझी आभारी आहे…,’ बड्डे बॉय केएल राहुलला गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने दिल्या खास शुभेच्छा