नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (१४ मार्च) पार पडलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर आता भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासह तिन्ही विभागात चांगली कामगिरी करत इंग्लंड संघाला पछाडले आहे.
भारतीय संघाच्या या विजयात काही खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्याच खेळाडूंचा येथे आढावा घेण्यात आला आहे.
१) इशान किशन :
या सामन्यात शिखर धवनऐवजी इशान किशनला भारतीय संघात संधी देण्यात आली होती .आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. १६५ धावांचा पाठलाग करताना केएल राहुल लवकर माघारी परतला होता. त्यानंतर इशानने विराट कोहलीसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा अजिंक्य रहाणेनंतर तो दुसरा फलंदाज ठरला आहे. इशानने ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी केली.
२) विराट कोहली :
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म होता. परंतु या सामन्यात त्याने इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच खेळून काढले. त्याने मैदानाच्या चारही बाजूला शॉट खेळले. त्याने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ४९ चेंडूमध्ये नाबाद ७३ धावांची खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. यामध्ये शेवटच्या चेंडूवरील विजयी षटकाराचा देखील समावेश आहे.
३) शार्दुल ठाकूर :
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर याने देखील भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शार्दुलने आपल्या गोलंदाजीतील मिश्रणाने इंग्लंडच्या फलंदाजांना अडकवून ठेवले होते. तसेच ४ षटक गोलंदाजी करत त्याने महत्त्वाचे २ गडी बाद केले. यादरम्यान त्याने फक्त २९ धावा दिल्या.
४) रिषभ पंत :
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने, या सामन्यातदेखील भारतीय संघाला गरज असताना आक्रमक खेळी करत सामन्यात पुनरागमन करून दिले. रिषभने आपल्या खेळीत १३ चेंडू खेळले, यात त्याने २६ धावा केल्या. दरम्यान त्याने २ षटकार लगावले.
५) वॉशिंग्टन सुंदर :
भारतीय संघातील युवा अष्टपैलू फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने या सामन्यातही महत्वाचे स्पेल टाकत इंग्लंड संघाला रोखण्याचे काम केले आहे. सुंदरने ४ षटके गोलंदाजी करत २९ धावा देत २ महत्वाचे गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगानी स्पिनर राशिद खानने रचला इतिहास, ठरला २१ व्या शतकातील विश्वविक्रमी गोलंदाज
‘भिडू तू बिनधास्त भीड’; सामन्यापूर्वी इशान किशनला रोहितने दिला होता मोलाचा सल्ला
हाच तो रस्ता..! बाद झाल्यानंतर कोहलीने ‘असा’ दाखवला स्टोक्सला पव्हेलियनचा मार्ग; पाहा व्हिडिओ