गोवा – इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) माजी विजेत्या बंगलोर एफसीने अजूनही स्वतःला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राखले आहे. ८व्या मिनिटाला ०-१ अशा पिछाडीवर पडल्यानंतरही बंगलोरने चांगले पुनरागमन केले आणि ओदिशा एफसीवर २-१ असा विजय मिळवला. नंदकुमार सेकरने ८व्या मिनिटाला ओदिशाला आघाडी मिळवून दिली, परंतु त्यानंतर बंगलोरकडून दानिश फारूक (३१ मि.) व क्लेईटन सिल्वा ( ४९ मि., पेनल्टी) यांनी गोल केले. ओदिशाकडून अखेरच्या २० मिनिटांत गोलसाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. एक प्रयत्न क्रॉसबारला लागून अपयशी ठरला अन्यथा या सामन्याचा निकाल बरोबरीत लागला असता. या विजयानंतर बंगलोरने २६ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
सेमी फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी ओदिशा एफसी आणि माजी विजेत्या बंगलोर एफसी यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळण्याची अपेक्षा होती, कारण या दोन्ही संघांना सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. पण, त्याचसोबत टॉप फोअरमधील संघांच्या कामगिरीवरही दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही संघ आक्रमक पवित्र्यात मैदानावर उतरले आणि पहिले यश ओदिशाच्या वाट्याला आले. ८व्या मिनिटाला नंदकुमार सेकरने ओदिशाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १३व्या मिनिटाला ओदिशाला बॉक्सबाहेर फ्री किक मिळाली, परंतु त्यावर झेव्हियर हर्नांडेझ याला गोल करता आला नाही. १९व्या मिनिटाला रोशन नाओरेम बंगलोरला बरोबरीचा गोल करून देण्यासाठी ओदिशाच्या बॉक्समध्ये शिरला, परंतु ओदिशाची बचावफळी तितकीच भक्कम होती.
२२व्या मिनिटाला बंगलोरच्या प्रतिक चौधरीचा सुरेख बचाव पाहायला मिळाला. जेरीच्या पासवर जॉनाथास क्रिस्टीयन चेंडू घेऊन बंगलोरच्या पेनल्टी क्षेत्रात शिरला होता. वन ऑन वन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच प्रतिकने चेंडू हिसकावला अन् ओदिशाचा दुसरा गोल होऊ दिला नाही. ३१व्या मिनिटाला बंगलोर एफसीने बरोबरीचा गोल केला. नाओरेमने कॉर्नरवरून भिरकावलेला चेंडू दानिश फारूखने अचूक हेरला अन् हेडरद्वारे गोल केला. ४५+३ मिनिटाला नंदकुमारला फक्त गोलरक्षकाला चकवायचे होते अन् ओदिशाने २-१ अशी आघाडी घेतली असती. पण, चेंडूला अंतिम स्वरूप देण्यात यो फसला अन् पहिला हाफ १-१ असाच बरोबरीत सुटला.
४९व्या मनिटाला लालरुथाराने पेनल्टी बॉक्समध्ये उदांता सिंगला ढकलले अन् रेफरीने जराही विलंब न करता बंगलोरला पेनल्टी दिली. त्यावर क्लेईटन सिल्वाने गोल करताना बंगलोरला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ५३व्या मिनिटाला प्रिन्स इबाराने अगदी जवळून चेंडू गोलजाळीच्या दिशेने भिरकावला, परंतु ओदिशाचा गोलरक्षक कमलजित सिंगने तितक्याच चपळतेने तो अडवला. पण, रिटर्न प्रयत्नात ब्रूनो सिल्वाने संधी गमावली अन् चेंडू क्रॉसबारला लागून बाहेर गेला. ओदिशाला यावेळी नशीबाने साथ दिली. ६१व्या मिनिटाला बंगलोरने अनुभवी सुनील छेत्री याला मैदानावर उतरले. ७४व्या मिनिटाला फारूकला पिवळे कार्ड मिळाले आणि हे त्याचे चौथे कार्ड असल्याने पुढील सामन्याला त्याला मुकावे लागणार आहे.
७५व्या मिनिटाला ओदिशाने बरोबरीचा गोल केलाच होता, परंतु क्रॉसबार आडवा आला. इसाक छकछुआकने गोलरक्षकाला चकवले, परंतु चेंडू क्रॉसबारवर आदळून माघारी फिरला. त्यानंतर ८४व्या मिनिटाला झेव्हियर डर्नांडेझने हेडरद्वारे मारलेला चेंडू बंगलोरच्या गोलरक्षकाच्या थेट हातात विसावला. ओदिशाकडून सातत्याने प्रयत्न होताना दिसले, परंतु यश त्यांच्या वाट्याला येत नव्हते. बंगलोरकडून मग वेळ खाऊ खेळ सुरू झाला आणि त्यामुळे ओदिशाचे खेळाडू अजून तणावात गेले. त्यानंतर त्यांना पुनरागन करता आले नाही.
निकाल – बंगलोर एफसी २ ( दानिश फारूक ३१ मि., क्लेईटन सिल्वा ४९ मि. ( पेलन्टी) ) विजयी विरुद्ध ओदिशा एफसी १ ( नंदकुमार सेकर ८ मि. )