भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. लंडनच्या के ओव्हल मैदानात सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 3 विकेट्सच्या मोबदल्यात 327 धावा केल्या होत्या. यामध्ये ट्रेविस हेड खणखणीत शतक झळकावत नाबाद राहिला. या शतकानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने हेडची तुलना महान यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट याच्याशी केली.
आयसीसीसोबत बोलताना रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने ट्रेविस हेड (Travis Head) याची तुलना ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याच्याशी केली. तो असेही म्हणाला की, जितक्या वेगाने गिलख्रिस्टने धावा केल्या, त्यापेक्षा अधिक वेगाने हेड धावा करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील हेडच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 163 धावा केल्या. तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाजही बनला.
पाँटिंग म्हणाला की, “तो गिलख्रिस्टसारखा आहे. खरं तर, तो कदाचित इतक्या वेगाने धावा करत आहे, जितक्या वेगाने गिलख्रिस्टने कधी धावा केल्या असतील. त्याचा स्ट्राईक रेट या संपूर्ण डब्ल्यूटीसी क्वालिफिकेशनदरम्यान 81चा राहिला असेल, जो 500 हून अधिक धावा करणाऱ्या इतर फलंदाजापेक्षा जास्त आहे.”
तो असेही म्हणाला की, हेडचा आत्मविश्वास प्रत्येक सामन्यात वाढत आहे. तो डावाच्या सुरुवातीलाच चौकार मारतो. हेच तुम्हाला एका मधल्या फळीतील फलंदाजाकडून हवे असते. हेडने 174 चेंडूत 163 धावा केल्या आहेत. यामध्ये 25 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.
पुढे बोलताना पाँटिंग म्हणाला की, “प्रत्येक सामन्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढत आहे. त्याचा स्ट्राईक रेट वाढत जात आहे. तो डावाच्या सुरुवातीलाच चौकार मारून गोलंदाजाला दबावात टाकतो. तुम्हाला एका मधल्या फळीतील फलंदाजाकडून हेच हवे असते आणि मागील दोन वर्षांपासून तो शानदार पद्धतीने असे करत आहे.”
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हेडने स्मिथसोबत मिळून 251 धावांची भागीदारी केली होती. यात स्मिथच्या नाबाद 95 धावांचा समावेश होता. पाँटिंग म्हणाला की, “मला वाटते की, जेव्हा तो सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी आला, तेव्हा तुम्हाला तुमची योजना योग्यप्रकारे अंमलात आणावी लागेल. हेच चांगले ठरेल की, त्याच्याविरुद्ध जास्त आक्रमण करू नये. कारण, तुम्ही कोणताही खराब चेंडू टाकला, तर तो त्याच्यावर जोरदार शॉट खेळेल. ते शिकले असतील की, पहिल्या डावात त्यांनी हेडला कशाप्रकारे गोलंदाजी केली आहे. नक्कीच तो दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करेल.”
हेड 163 धावांवर तंबूत
पाँटिंगने हेडसाठी आशा व्यक्त केली असली, तरीही पहिल्या दिवशी 146 धावा करणारा हेड दुसऱ्या दिवशी फार वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. तो 163 धावा करून बाद झाला. स्मिथनेही दुसऱ्या दिवशी शतक साजरे करत 121 धावांवर खेळपट्टी सोडली. सध्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने 7 विकेट्स गमावत 422 धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, सब्स्टिट्यूट म्हणून आलेल्या अक्षर पटेल याने मिचेल स्टार्क याला धावबाद करत तंबूचा रस्ता दाखवला होता. (former cricketer ricky ponting compared travis head with adam gilchrist )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पहिल्या दिवशी विकेटसाठी तरसणाऱ्या गोलंदाजांवर भडकला रोहित, लाईव्ह सामन्यात दिली शिवी, Video
शुभमंगल सावधान! प्रसिद्ध कृष्णाही बांधला गेला लग्नबंधनात, नवदाम्पत्याचे फोटो व्हायरल