भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक खूप व्यस्त आहे. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. दुसरीकडे राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली पहिल्यांदाच युवा क्रिकेटपटूंनी भरलेला भारताचा ताफा श्रीलंकेविरुद्ध दोन हात करणार आहे. अशात माजी भारतीय अष्टपैलू रितिंदर सोढी यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, द्रविडचे तात्पुरते प्रशिक्षक बनणे हा या गोष्टीचा संकेत आहे की तो लवकरच शास्त्रींच्या जागी भारतीय संघाचा भावी मुख्य प्रशिक्षक बनेल.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सोढी म्हणाले की, “सर्वात पहिली बाब म्हणजे, शास्त्रींनी प्रशिक्षक म्हणून खूप चांगली कामगिरी केली आहे. परंतु लवकरच त्यांचा प्रशिक्षकपदाचा करार संपणार आहे. अशात संघ व्यवस्थापन भावी प्रशिक्षकाच्या रुपात, शास्त्री आणि केवळ एका दौऱ्यासाठी प्रशिक्षक बनलेला द्रविड या दोघांचाही विचार करू शकते. माझ्या मते, द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेला पाठवण्यात आले आहे; यावरुन स्पष्टपणे दिसून येत आहे की तो भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्याच्या रांगेत तो आघाडीवर आहे. तो एकटाच असा व्यक्ती आहे, जो शास्त्रींची जागा घेऊ शकतो.”
“मी अगदी छातीठोकपणे ही गोष्ट सांगू इच्छितो. कारण या विषयावर नक्कीच भविष्यात चर्चा होईल. मला तर नाही वाटत की, त्याला केवळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष बनून राहायचे आहे. तो श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी सहज नकार देऊ शकत होता. त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. जर त्याला संघ प्रशिक्षक बनायचेच नसते तर तो श्रीलंकेला न जाता बेंगलोरमध्येच राहिला असता. परंतु त्याने ही जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. त्याला आपल्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करुन घ्यायची आहे,” असेही ते म्हणाले.
“माझे स्पष्ट मत आहे की, शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोणाला बनवायचे असेल तर द्रविडचे नाव सर्वात पुढे असायला हवे. त्याच्यासारखा महान खेळाडू फक्त तात्पुरता पर्याय असूच शकत नाही,” असे सोढी यांनी शेवटी सांगितले.
सोढी यांच्या म्हणण्यानुसार, शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडवर मुख्य संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल की नाही?, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बड्या खेळाडूला सापडली टीम इंडियाची ‘कमजोर बाजू’, इंग्लंड घेणार भरपूर फायदा
वेध ‘माही’च्या वाढदिवसाचे! जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशीच धोनी ट्रेंडमध्ये, पाहा काही खास पोस्ट