भारतीय संघाने रविवारी (०६ मार्च) श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना १ डाव आणि २२२ धावांनी खिशात घातला. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व नवीन कर्णधार रोहित शर्मा करत होता. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहितच्या नेतृत्वाला गुण दिले आहेत. त्यांनी हे गुण १० पैकी दिले आहेत. विशेष म्हणजे, रोहित नेतृत्व हा पहिलाच कसोटी सामना होता आणि त्याच्या नेतृत्वात पहिल्याच कसोटी सामन्यात संघाला शानदार विजय मिळवून दिला.
भारताने श्रीलंका (India vs Sri Lanka) संघाला अवघ्या तीन दिवसातच मात दिली. आपल्या पहिल्या डावातच भारतीय संघाने ८ विकेट्स गमावत ५७४ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांच्या आव्हानाचा सामना करणाऱ्या श्रीलंका संघाचा पहिला डाव १७४ धावांवर आणि दुसरा डाव १७८ धावांवर संपुष्टात आला.
माध्यमांशी बोलताना गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “मी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाला १० पैकी ९.५ गुण देऊ इच्छितो.” सामन्यादरम्यान रोहितने काही शानदार निर्णय घेतले होते. त्यामध्ये त्याने दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला थांबवत जयंत यादवला गोलंदाजी दिली होती. दुसरीकडे रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनही जबरदस्त गोलंदाजी करत होते.
सुनील गावसकर पुढे बोलताना म्हणाले की, “कसोटी कर्णधार म्हणून रोहितने शानदार सुरुवात केली. जेव्हा तुम्ही तीन दिवसांच्या आत सामना जिंकता, तेव्हा हे दाखवून देते की, तुमचा संघ खूप चांगला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा गोलंदाजीतील बदलही खूप प्रभावी होते. झेल तिथेच जात होते, ज्याठिकाणी खेळाडू होते.”
दक्षिण आफ्रिकेतील एका कसोटी मालिकेत १-२ ने पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहितने विराटची जागा घेत भारतीय संघाचा नवीन कसोटी कर्णधार म्हणून पद स्वीकारले होते.
भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारी (१२ मार्च) बंगळुरू येथे सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘मुलाखत घेताना मला खेळाडूंची भिती वाटायची, ते मला…’, स्पोर्ट्स अँकरचा क्रिकेटपटूंबद्दल मोठा खुलासा
महान फलंदाज गावसकरांनी शेन वॉर्नबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य; भडकली ऑस्ट्रेलियन मीडिया