आता इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सोमवारी (दि. 29 मे) संपली आहे. या स्पर्धेचा विजेता चेन्नई सुपर किंग्स संघ बनला. त्यांनी पाचव्यांदा ट्रॉफी उंचावली. यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023वर आहे. अशात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 7 ते 11 जूनदरम्यान डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध भिडताना दिसतील. या अंतिम सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी मोठे भाष्य केले आहे. सुनील गावसकरांनी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील भारतासमोरील आव्हाने सांगितली आहेत. चला तर गावसकर काय म्हणालेत जाणून घेऊयात…
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना वाटते की, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) भारतीय संघाच्या खेळाडूंपुढे सर्वात मोठे आव्हान आयपीएल टी20 क्रिकेट प्रकारातून बाहेर पडण्याचे असेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ 7 जूनपासून इंग्लंडच्या ‘के ओव्हल’ मैदानात डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळेल. यामध्ये खेळणारे अधिकतर खेळाडू आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत भाग घेऊन पोहोचले आहेत.
गावसकरांनी मंगळवारी (दि. 30 मे) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “सर्वात मोठी परीक्षा ही असेल की, प्रत्येकजण टी20 क्रिकेटप्रकारात खेळून येईल आणि कसोटी क्रिकेट हा दीर्घ प्रकार आहे. त्यामुळे मला वाटते की, हे एक मोठे आव्हान असणार आहे. सर्व भारतीय खेळाडूंमध्ये फक्त अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हाच दीर्घ प्रकारानुसारात खेळला आहे. कारण, तो काऊंटी क्रिकेट खेळत आहे.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “भारताकडे फक्त चेतेश्वर पुजारा इंग्लिश काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये खेळत आला आहे, त्यामुळे तो एकमेव खेळाडू असेल, जो या परिस्थितीत दीर्घ प्रकारात खेळत होता. त्यामुळे त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान असणार आहे.”
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानेही दीर्घकाळ खराब फॉर्मचा सामना केल्यानंतर आयपीएलमध्ये मजबूत पुनरागमन केले आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला आयपीएलचे पाचव्यांदा विजेतेपद जिंकून देण्यात मदत केली. त्याच्याविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, “34 वर्षांच्या या खेळाडूला इंग्लंडच्या परिस्थितीचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरेल. त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे, त्याने इंग्लंडमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. त्यामुळे मला वाटते की, तो पाचव्या क्रमांकावर महत्त्वाचा खेळाडू ठरेल. माझा असाही विश्वास आहे की, त्याला स्वत:ला सिद्ध करायचे आहे. मला आताही वाटतं की, तो अजून भरपूर क्रिकेट खेळू शकतो आणि त्याच्यासाठी ही शानदार संधी आहे.”
रहाणेची आयपीएल 2023मधील कामगिरी
रहाणेने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएल 2023 हंगामात 14 सामने खेळताना 32.60च्या सरासरीने 326 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. आता तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (former cricketer sunil gavaskar talk about big challenges for team india in wtc final 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुस्तीपटूंविरुद्धच्या पोलीस कारवाईवर अनिल कुंबळेची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हातापाई…’
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका