क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला (Vinod Kambli) रविवारी (२७ फेब्रुवारी) मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबईच्या वाद्रे येथे विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना एका गाडीला टक्कर मारली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, त्यानंतर कांबळीला जामीनही मिळाला आहे.
Former Indian cricketer Vinod Kambli was arrested for hitting a car under the influence of alcohol. Further investigation is underway: Bandra Police
(Pic Source: Vinod Kambli's Twitter handle) pic.twitter.com/s1SoxnTH7X
— ANI (@ANI) February 27, 2022
वृत्तसंस्था एएमआयने ही बातमी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय विनोद कांबळी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने गाडीला धडक दिल्याचा आरोप करत एका व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर वांद्रे पोलिसांनी विनोद कांबळीला अटक केली होती. वृत्तांमध्ये असेही म्हटले जात आहे की, विनोद कांबळीनेही त्याची कार सोसायटीच्या गेटवर धडकवली होती.
सायबर गुन्ह्याचाही झाला होता शिकार
नुकत्याच काही काळापूर्वी विनोद कांबळी चर्चेत आला होता. तो एका सायबर गुन्ह्याचा शिकार झाला होता. केव्हायसी अपडेटच्या नावाखाली एका व्यक्तीने स्वत:ला बँक कर्मचारी सांगत कांबळीला सव्वा लाखांचा गंडा घातला होता. त्यानंतर कांबळीने या प्रकरणाचा गुन्हा वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता. सायबर टीमने यावर ऍक्शन घेतली होती. त्यानंतर कांबळीला त्याची रक्कम पुन्हा मिळाली होती.
विनोद कांबळीची कारकीर्द
विनोद कांबळीने भारतासाठी १०७ वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३२.५९ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर २ शतके आणि १४ अर्धशतके आहेत. दुसरीकडे १७ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या, ज्यात ४ शतकांचा समावेश आहे. त्याने भारतीय संघासाठी शेवटचा सामना २९ ऑक्टोबर, २००० रोजी खेळला होता.
त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने तिथेही चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२९ प्रथम श्रेणी सामने खेळताना ५९.६७ च्या सरासरीने ९९६५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३५ शतके आणि ४४ अर्धशतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ संघांतील सामन्याने होणार आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात? वाचा सविस्तर
श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना