सध्या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू तुफान फॉर्ममध्ये आहेत. विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा हा फॉर्म भारतीय संघासाठी खूपच सुखावणारी बाब आहे. कर्णधार रोहित शर्मा, विस्फोटक फलंदाज विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंनी फलंदाजीत दम दाखवला आहे. तसेच गोलंदाजीत, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा हेदेखील चमकले आहेत. मात्र, भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याच्या मते, भारताला विश्वविजेता बनवणारा खेळाडू रोहित किंवा विराट नाही, तर भलताच आहे. चला तर, जाणून घेऊयात…
युवराजचे भाष्य
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेविषयी भविष्यवाणी करणाऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे नावही जोडले गेले आहे. त्यानेही या स्पर्धेत धमाल प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) याच्या जागी युवा खेळाडू शुबमन गिल याचे नाव घेतले आहे.
माध्यमांशी बोलताना युवराज म्हणाला की, “शुबमन गिल विश्वचषक 2023 स्पर्धेत गेमचेंजर ठरू शकतो. तो शानदार लयीत आहे. तो एक असा खेळाडू आहे, जो विरोधकांची रणनीती वाईटरीत्या उद्ध्वस्त करू शकतो. आशा करतो की, तो मोकळेपणाने फलंदाजी करेल.”
शुबमन गिल शानदार लयीत
आयपीएल 2023 स्पर्धेत कमाल केल्यानंतर शुबमन गिलची बॅट जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तळपली नव्हती. याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजविरुद्धही त्याने निराश केले. मात्र, आशिया चषक 2023 स्पर्धेत त्याने लय पकडली. त्याने आपल्या मागील 5 वनडे सामन्यात कमालीची फलंदाजी केली. त्याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने अखेरच्या 5 वनडेत 345 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतकही केले आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा दमदार फलंदाज शुबमनकडून सर्वांनाच भरपूर अपेक्षा आहेत.
शुबमनची कारकीर्द
शुबमन 24 वर्षीय असून त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 18 कसोटी सामने खेळताना 32.2च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत. यात 2 शतकांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त त्याने 35 वनडे सामने खेळताना 66.1च्या सरासरीने 1917 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 30.4च्या सरासरीने 304 धावा केल्या आहेत. यामध्येही त्याच्या नावावर 1 शतकाची नोंद आहे. (former cricketer yuvraj singh has called this indian cricketer a game changer in the world cup 2023)
हेही वाचा-
World Cup Countdown: वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्याची हॅट्रिक करणारी ऑस्ट्रेलिया
सराव सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने, टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग; पाहा संघ