शनिवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील 12वा सामना खेळला जाणार आहे. यावेळी शाहीन शाह आफ्रिदीवर अनेकांच्या नजरा असतील. त्याने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना खूप त्रास दिला आहे. दुसरीकडे, या सामन्यात जास्तीत जास्त विकेट घेण्यासाठी भारतीय संघ जसप्रीत बुमराह याच्यावर अवलंबून असेल. अशात इंग्लंडचा विश्वविजेता माजी कर्णधार ऑयन मॉर्गन याने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज बुमराहविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचे खूप कौतुक केले. त्याने म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान (IndvsPak) सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह गेम चेंजर ठरू शकतो. तसेच, बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची गोलंदाजी खूपच चांगली दिसते.
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, “माझ्या मते भारतीय संघाची गोलंदाजी थोडी चांगली आहे. जसप्रीत बुमराह योग्य वेळी फॉर्ममध्ये आला आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी तो डब्लिनमध्ये खेळला, तेव्हा त्याच्या नजरा विश्वचषकावर होत्या. जसप्रीत बुमराह हा गेम चेंजर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या. वेगवेगळ्या टप्प्यांवर विकेट घेत तो दबाव कायम ठेवतो. मला वाटते की, तो दोन्ही संघात गेम चेंजर आहे आणि मी पाकिस्तानविरुद्ध नाही. जडेजा, कुलदीप आणि शार्दुल यांच्यासोबत बुमराह संघाच्या गोलंदाजीतील समतोल साधतो. हार्दिक पंड्याही भारतासाठी अतिशय महत्त्वाची गोलंदाजी करतो.”
याअगोदर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने देखील जसप्रीत बुमराहला जगातील सर्वात घातक गोलंदाज म्हटले आहे. गौतम गंभीरच्या मते, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि जसप्रीत बुमराह यांच्यात खूप फरक आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या पद्धतीने मिचेल मार्शला बाद केले ते जबरदस्त होते. त्यामुळे या मोठ्या सामन्यात भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह आणि शाहिन शाह आफ्रिदी या दोघांच्या गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. (Former England captain Eoin Morgan says this about indian bowler ahead of ind vs pak match)
हेही वाचा-
याला म्हणतात INDvsPAK सामन्याची क्रेझ! चाहत्यांनी स्टेडिअमबाहेर केली तुफान गर्दी, पाहा व्हिडिओ
‘मी त्याला KL Rahul म्हणत नाही…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी दिग्गजाचे राहुलबाबत मोठे विधान