मुंबई । इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू विक्रम सोलंकी यांची सरे काउंटी क्रिकेट क्लबच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे भारतीय असलेले सोलंकी यांची मिशेल डि व्हेनुटो यांच्या जागी नियुक्त करण्यात आली आहे. यापूर्वी सोलंकी मिशेल यांचे सहाय्यक प्रशिक्षक होते.
44 वर्षीय सोलंकी यांचा जन्म राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात झाला होता. विक्रम आठ वर्षांचा असताना त्यांचे आई वडील इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झाले.
विक्रम यांनी 2000 ते 2007 दरम्यान इंग्लंडकडून 51वनडे आणि 3 टी20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्यांच्या नावावर 1097 धावा असून त्यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. 2016 साली ते क्रिकेटमधून निवृत्त झाले.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण देणे सुरू केले. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
प्रथम श्रेणीचे 325 सामने खेळणारे विक्रम यांनी सरे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मी मुख्य प्रशिक्षक झाल्यामुळे खूपच आनंदित आहे. माझ्याजवळ अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. क्रिकेटच्या सर्वच प्रकारात आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.”
यासोबतच सोलंकी यांनी (2009-2012) या दरम्यान प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे. 2017 पर्यंत त्यांनी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली आहे. प्रशिक्षकासोबत त्यांना प्रशासनाचा देखील दांडगा अनुभव आहे.