विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या मोठ्या सामन्यात भारत न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने या सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी खेळाडूंची घोषणा केली होती, ज्यामध्ये मागील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच संघातील दिग्गज गोलंदाज देखील पूनरागमन करत आहेत.
त्यामुळे भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. अशातच भारतीय संघातील माजी खेळाडू लक्ष्मीपती बालाजीने संघातील वेगवान गोलंदाजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मीपती बालाजी म्हणाले, “बुमराहच्या प्रतिभेकडे पाहता त्याला त्याचासारखाच पर्यायी गोलंदाज असणे गरजेचे आहे. तो एक चांगला आणि सामना जिंकणारा गोलंदाज असल्याने त्याला कोणी पर्याय असू शकत नाही. पण मोहम्मद सिराजमध्ये ती क्षमता आहे. गोलंदाजीमध्ये सिराज आणि बुमराह यांच्यात साम्य आहे. डावखुऱ्या फलंदाजांसाठी दोघांचेही चेंडू बाहेर पडतात आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सरळ राहतात.”
दोघांचीही बाद करण्याची पद्धत सारखीच
तसेच ते पुढे म्हणाले की, “जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या गडी बाद करण्याच्या पद्धतीतही भरपूर साम्य आहे. मोहम्मद सिराज आणि बुमराह हे त्रिफळाचीत, पायचीत आणि यष्टीच्या मागे झेलबाद करण्यात अग्रेसर आहेत. जर बुमराह संघात नसेल तर कर्णधारांकडे बचावाऐवजी आक्रमक पर्याय असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर संघात बुमराह आणि शमी नव्हते. तरीही भारतीय संघाच्या गोलंदाजांनी २० गडी बाद केले होते. याचा अर्थ गोलंदाजांमध्ये क्षमता आहे.”
मोहम्मद सिराजची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता तो चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. तसेच इंग्लंडमध्ये जलद गोलंदाजांसाठी भरपूर मदत उपलब्ध असते. त्यामुळे सिराजला संधी मिळाली तरी तो संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करू शकतो
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित आणि विराट यांच्यासोबत चर्चा करताना मिळतात ‘हे’ सल्ले, शुभमन गिलचा खुलासा