येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ला मिळाले आहे. तसेच येत्या २९ मे रोजी यासंदर्भात विशेष जनरल मीटिंग होणार आहे. ज्यामध्ये ही स्पर्धा कुठे खेळवण्यात येईल? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात येणार होते. परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. अशातच या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा मानकरी कोण असेल? याबाबत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम यांनी भाष्य केले आहे.
पाकिस्तान संघासाठी १०४ कसोटी सामने आणि ३५६ एकदिवसीय सामने खेळणारे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी म्हटले की, “यावर्षी विश्वचषक स्पर्धेत विजयाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ आहे. कारण हा संघ कुठलीही भीती न बाळगता क्रिकेट खेळत आहे. यासोबतच इंग्लंड संघदेखील ही स्पर्धा जिंकू शकतो. तसेच न्यूझीलंडही एक मजबूत संघ आहे आणि वेस्ट इंडिज संघाबाबत आपण काहीच बोलू शकत नाही. जर संघातील दिग्गज खेळाडूंना संघात संधी दिली गेली; तर वेस्ट इंडिज संघ देखील प्रबळ दावेदार असेल.”
तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला नापसंती दर्शवली आहे. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की, “बाबर आजमला योग्य संघ नियोजन करता आले नाहीये. या मोठ्या स्पर्धेपूर्वी त्याला मजबूत प्लेइंग ११ निवडणे आवश्यक आहे. जेणेकरून ते दुसऱ्या संघाविरुद्ध चांगला लढा देतील.”
ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२०मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार होती. परंतु २०२०मध्ये जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. ज्याचा परिणाम या स्पर्धेवरही दिसून आला होता. येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात कोरोनाची स्थिती आटोक्यात आली तर ही स्पर्धा भारतातच खेळवली जाईल. जर ही स्पर्धा भारतात झाली नाही तर बीसीसीआय यूएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करू शकते. तत्पुर्वी सप्टेंबर महिन्यात बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने देखील खेळवणार आहे असे म्हटले जात आहे. असे झाले तर खेळाडूंना टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सराव करण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूची दुरावस्था, कोरोनामुक्त होऊनही म्हणतोय अजूनही बाधित असल्यासारखं वाटतंय
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाच्या जुन्या बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल
वसीम जाफरने शेअर केले चक्क पाकिस्तानी पंतप्रधानांचे मिम, पाहा काय आहे प्रकरण