पाकिस्तान संघ 27 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे झालेल्या सामन्यात झिम्बाब्वे संघाकडून अवघ्या 1 धावेने पराभूत झाला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही आपला राग व्यक्त केला. यामध्ये ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तर याचाही समावेश आहे. पाकिस्तान झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत होताच अख्तरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने पाकिस्तान संघाला या आठवड्यात परत येण्यास सांगितले आहे. तो म्हणाला की, पाकिस्तान संघ टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12 फेरीतूनच घरी परतेल.
काय म्हणाला शोएब अख्तर?
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला आहे की, झिम्बाब्वेच्या हातून पाकिस्तान पराभूत झाल्याने हे सिद्ध झालंय की, आमच्याकडे एक खराब कर्णधार आहे. संघाची जबाबदारी खराब कर्णधाराच्या खांद्यावर आहे.
युट्यूब चॅनेलवर अख्तर म्हणाला…
स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर अख्तर म्हणाला की, “मी काय बोलू, मी एवढेच म्हणले की, यामध्ये कोणतीही शंका नाही की, पाकिस्तानकडे खूप खराब कर्णधार आहे. सलग दुसरा पराभव आहे आणि संघ जवळपास विश्वचषकातून बाहेर पडला आहे. मोहम्मद नवाजला शेवटचे षटक देऊन आम्ही तीन सामने गमावले आहेत. नेतृत्वात खूप कमतरता आहेत. समजत नाहीये की, संघ कशाप्रकारे खेळत आहे. संघ व्यवस्थापनापासून पीसीबीपर्यंत कोणालाच काही कळत नाहीये की, काय केले पाहिजे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “सलामीवीर सतत अपयशी ठरत आहेत. फखर जमान बसलाय, पण त्याला खेळवले जात नाहीये. तो बॅकफूटवर चांगली कामगिरी करू शकतो. मात्र, माहिती नाहीये की, संघ व्यवस्थापन कसा विचार करतो.”
पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव
खरं तर, गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) झिम्बाब्वेने हारत चाललेला सामना पालटला आणि पाकिस्तानला अवघ्या 1 धावेने पराभूत केले. पाकिस्तानला शेवटच्या चेंडूत 3 धावांची गरज होती, पण त्यांच्या फलंदाजांना हा विजय मिळवता आला नाही.
पाकिस्तान संघाच्या 6 विकेट्स पडल्यानंतर सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता. शेवटच्या षटकात विजयासाठी पाकिस्तानला 11 धावांची गरज होती. 88 धावसंख्येवर पाकिस्तानने 5 विकेट्स गमावल्या होत्या. सिकंदर रझा (Sikandar Raza) याने सलग 2 चेंडूवर 2 विकेट्स घेत पाकिस्तानच्या चिंतेत भर घातली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यापूर्वी पत्नीचा ‘हा’ नियम पाळतो सूर्यकुमार, फलंदाजीला उतरताच करतो गोलंदाजांचं काम तमाम
मेंटरबरोबर बॅटींग कोच एमएस धोनी! हार्दिक पंड्या-रिषभ पंतला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला






