इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. गुरुवारी (दि. १९ मे) हंगामातील ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. या सामन्यात बेंगलोर संघाने गुजरातवर ८ विकेट्सने विजय मिळवला. यासोबतच त्यांनी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत. अशात शनिवारी (दि. २१ मे) बेंगलोर संघाला वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. गुजरातविरुद्ध शानदार फटकेबाजी करणारा बेंगलोरचा फलंदाज विराट कोहली म्हणाला आहे की, तो या सामन्यात रोहित शर्मा याच्या मुंबई संघाला पाठिंबा देईल. यासोबतच त्याने मुंबईला पाठिंबा देण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित राहण्याचेही संकेत दिले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी असणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) याने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्याशी चर्चा केली. यावेळी तो म्हणाला की, “२ दिवसांपासून आपल्या पायांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, मुंबईलाही पाठिंबा देत आहे. मुंबईसाठी आमच्याकडे आणखी २ समर्थक आहेत. फक्त २ नाहीत, तर मला वाटते की, आणखी २५ समर्थक आहेत. तुम्ही आम्हाला स्टेडिअममध्येही पाहू शकता.”
विराट दीर्घकाळानंतर फॉर्ममध्ये परतला आहे. याचा प्रत्यय गुजरातविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाला. त्याने यादरम्यान ५४ चेंडूत ७३ धावांची विस्फोटक खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ८ चौकारांचा पाऊसही पाडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावत १६८ धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाने विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या सलामीवीरांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर १८.४ षटकांमध्येच २ विकेट्स गमावत १७० धावा चोपल्या. तसेच, सामना खिशात घातला. या विजयासह बेंगलोर संघ गुणतालिकेत अव्वल ४ संघात पोहोचला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या विजयानंतर बेंगलोर संघाचे १४ सामन्यात १६ गुण झाले आहेत. यासोबतच सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघही स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. कारण, त्यांचे अद्याप १२ गुण आहेत. असे असले, तरीही दोन्ही संघांचे अजून १-१ सामने बाकी आहेत. मात्र, हा सामना जिंकल्यानंतरही त्यांचे १४ गुण होतील. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
मुंबई आणि दिल्ली संघात शनिवारी होणाऱ्या सामन्यानंतरच बेंगलोर संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल की नाही हे समजेल. कारण, मुंबईने विजय मिळवला, तर बेंगलोर संघ प्लेऑफमध्ये जाईल.
फॉर्म गेल्यानंतरही तोच काळ सर्वात आनंदी असल्याचं म्हणतोय विराट, वाचा कारण
रिकी पॉटिंगने दिलेला शब्द पाळला आणि आवेश खान आयपीएल स्टार झाला