न्यूझीलंडचा संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी (११ सप्टेंबर) पाकिस्तानला पोहोचला. न्यूझीलंडचा संघ १८ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. न्यूझीलंडने २००३ साली ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. याच्या आधी देखील न्यूझीलंडने १ वर्षापूर्वी पाकिस्तानचा दौरा केला होता. मात्र, कराचीमध्ये खेळाडू राहत असलेल्या हॉटेलबाहेर झालेल्या एका हल्ल्यानंतर न्यूझीलंड संघ तो सामना मध्येच रद्द करून मायदेशी परतले होते.
यावेळी न्यूझीलंड संघासोबत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा माजी फलंदाज थिलन समरवीरा देखील पाकिस्तानमध्ये आला आहे. या देशासोबत समरवीराच्या नको असलेल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
२००९ साली समरवीराला पाकिस्तानमध्ये एका आतंकी हल्ल्यात मांडीवर गोळी लागली होती. तेव्हा तो श्रीलंका संघासोबत पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमबाहेर श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर आतंकी हल्ला झाला होता. तेव्हा समरवीराला डाव्या मांडीवर गोळी लागली होती.
समरवीराने गोळी लागल्याच्या ३ महिन्यानंतर मैदानात केले होते पुनरागमन
गोळी लागल्यानंतरही समरवीराने याचा आपल्या क्रिकेट कारकिर्दीतवर परिणाम होऊ दिला नाही. ज्यावेळी श्रीलंका संघाच्या बसवर आतंकी हल्ला झाला होता, तेव्हा समरवीरा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. तेव्हा त्याने पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात लागोपाठ २ द्विशतक झळकावले होते.
मात्र, आतंकी हल्ल्यात जखमी झाल्यानंतर समरवीराला काही शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तो तब्बल ३ महिने मानसिकरित्या आणि शारिरिकरित्या लढत होता. यानंतरही समरवीराने हिंमत हारली नाही आणि त्यानेत्याच वर्षी जुलैमध्ये पाकिस्तान विरुद्धच आपला ५० वा कसोटी सामना खेळला होता.
समरवीराने २००१ साली भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. तेव्हा त्याने शतक देखील लगावले होते. श्रीलंकेचे अरविंद डिसिल्वा आणि हसन तिलकरत्ने यांच्या निवृत्तीनंतर समरवीराने मधल्या फळीत श्रीलंका संघात आपले स्थान पक्के केले होते.
परंतु २००६ साली त्याला खराब फॉर्ममुळे कसोटी संघातून वगळण्यात आले होते. यानंतर त्याने १८ महिन्यानंतर पुनरागमन केले होते. तेव्हा त्याने खेळण्याच्या शैलीत पूर्णपणे बदल केला होता. तो पहिल्यापेक्षा जास्त आक्रमक झाला होता. त्याने २००८ साली जुलै महिन्यात भारताविरुद्ध शतकी खेळी करत कसोटी कारकिर्दीत जबरदस्त पुनरागमन केले होते.
समरवीराने २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली
समरवीरा नियमितपणे आपला उत्कृष्ट खेळ करत होता. मात्र तरीही आशिया खंडाच्या बाहेरील त्याच्या फलंदाजीवर नेहमी प्रश्न उठवले जायचे. २०११ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात समरवीराला संघातून वगळण्यात आले होते. तेव्हा श्रीलंकेला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर श्रीलंकेच्या निवडकर्त्यांनी पुन्हा समरवीराला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात सामील केले होते.
या पुन्हा मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने २ शतक लगावले होते. तर डर्बनमध्ये समरवीराने केलेल्या शतकी खेळीमुळे श्रीलंकाने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिका जिंकली होती. मात्र यानंतर पुन्हा समरवीराचा फॉर्म बिघडू लागला आणि तो संघातून बाहेर होत राहिला. त्यानंतर अखेर त्याने २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
निवृत्तीनंतर समरवीराने प्रशिक्षक म्हणून आपली कारकीर्द निवडली. आता तो गेल्या २ वर्षांपासून न्यूझीलंड संघासोबत फलंदाजी प्रशिक्षकाचे काम करत आहे. सध्या तो न्यूझीलंड संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–अंतिम कसोटी रद्द होण्यासाठी आयपीएलला जबाबदार धरणाऱ्यांना इरफानचे खडेबोल; म्हणाला, ‘माझे दात पडले…’
–भारतीय खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा, दुसऱ्यांदा कोरोना चाचणीचा निकाल निगेटिव्ह, पण…
–दक्षिण आफ्रिकेने नाकारले, नामिबियाने स्वीकारले! ‘या’ अफ्रिकन खेळाडूला टी२० विश्वचषकासाठी नामिबियाकडून संधी






