जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून २७ खेळाडूला कायम केले. रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी, जसप्रीत बुमराह व रिषभ पंत यासारख्या प्रमुख भारतीय खेळाडूंना आपआपल्या संघाने अपेक्षेप्रमाणे रिटेन केले. मात्र, या २७ खेळाडूंमध्ये चार अशा खेळाडूंचा समावेश आहे, जे आत्तापर्यंत भारतासाठी एकही सामना खेळले नाहीत. याच चार खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया.
१) यशस्वी जयस्वाल-
आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने या रिटेंशनमध्ये कर्णधार संजू सॅमसन व जोस बटलर यांच्यासह मुंबईचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला ४ कोटी रुपये देत संघामध्ये कायम केले. भारतातील सर्वात प्रतिभावान फलंदाज म्हणून त्याला ओळखले जाते. २०२० एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात तो स्पर्धेचा मानकरी ठरला होता.
डाव्या हाताचा सलामीवीर असलेल्या यशस्वीने मागील दोन हंगामात राजस्थानचे प्रतिनिधित्व करताना १३ सामन्यात २८९ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने संघासाठी काही शानदार खेळ्या केल्या होत्या. त्याचे बक्षीस त्याला या रिटेंशनमध्ये मिळाले.
२) अर्शदीप सिंग-
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यालादेखील पंजाब किंग्सने मयंक अगरवालसह आपल्या संघात कायम केले. अर्शदीप याने मागील तीन हंगामात पंजाबसाठी मोक्याच्या क्षणी बळी घेण्याची कामगिरी करून दाखवली आहे. खेळाच्या कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करण्यास तो सक्षम मानला जातो. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २३ सामन्यात ३० बळी आपल्या नावे केले आहेत.
३) अब्दुल समद-
आयपीएल २०२० मध्ये आपल्या उत्तुंग षटकारांनी सर्वांना प्रभावित करणारा जम्मू-काश्मीरचा युवा अष्टपैलू अब्दुल समद याला सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या संघात कायम केले. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, कगिसो रबाडा व एन्रिक नॉर्किए या जगातील सर्व अव्वल वेगवान गोलंदाजांना त्याने सहजरित्या सीमारेषेबाहेर भिरकावून दिले होते. प्रथमश्रेणी क्रिकेटचा तितकासा अनुभव नसलेल्या अब्दुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन हंगामात २३ सामने खेळताना २२२ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १४९ इतका आश्चर्यजनक राहिला आहे.
४) उमरान मलिक-
सनरायझर्स हैदराबाद संघाने अब्दुल समदसह त्याचा जम्मू-काश्मीर संघातील सहकारी वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला रिटेन केले आहे. आयपीएल २०२१ मध्ये आधी संघाचा नेट बॉलर, त्यानंतर दुखापतग्रस्त टी नटराजनचा बदली खेळाडू, आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान गोलंदाज ते भारत अ संघात झालेली निवड असा मागील तीन महिन्यात मलिक याचा प्रवास राहिला आहे. मलिक याने आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले असले तरी, भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. भविष्यकाळाचा विचार करूनच सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाने त्याला आपल्या संघात कायम ठेवले. कर्णधार केन विलियम्सन व अब्दुल समद यांच्यासह तो रिटेन होणारा सनरायझर्सचा तिसरा खेळाडू बनला.
महत्त्वाच्या बातम्या-
आज सर्वात महाग रिटेन झालेला जड्डू चक्क आयपीएलमधून झालेला बॅन; मुंबई इंडियन्स होते कारण
क्रिकेटमधील राजामाणूस तो हाच! स्वत:च्या पगारात कपात करून धोनीने जडेजाला दिलं अव्वलस्थान
कसोटी सामना सुरु असतानाच ‘या’ महत्त्वाच्या सदस्याने सोडली पाकिस्तान संघाची साथ