आयपीएलचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. तर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. त्यानंतर स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत चढत जाणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची अनेक खेळाडूंची इच्छा असते. पण काहींना संधी मिळते तर काहींना नाही. ज्यांना संधी मिळते त्यांना चांगल्या कामगिरीच्या जोरावर आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागतं. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये असे सात खेळाडू आहेत जे आयपीएलच्या 17व्या हंगामात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
रिषभ पंत
रिषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे आयपीएल 2023 सह वर्षभरातील सर्वच क्रिकेट सामन्यातून त्याला बाहेर राहावे लागले. आता रिषभ पंत दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून एमसीएकडून त्याला फिट घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला रिषभ पंत वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. गेल्यावर्षी पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीच्या टीमचे नेतृत्व केले होते.
श्रेयस अय्यर
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर मागील वर्षी दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल 2023 खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणा याने केकेआरचे नेतृत्व केले. परंतु आता श्रेयस अय्यर फिट असून तो आयपीएल 2024 मध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात आपल्या टीमसाठी 95 धावांची दमदार खेळी केली होती.
मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर मिचेल स्टार्क हा तब्बल 8 वर्षांनी आयपीएलमध्ये उतरणार आहे. केकेआर टीमने मिचेल स्टार्कला मिनी ऑक्शनमध्ये 24.75 कोटींची बोली लावून आपल्या संघात घेतले. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मिचेल स्टार्कच्या येण्याने केकेआर टीम अजून मजबूत झाली आहे.
पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा गेल्यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप 2023 साठी तयारी करण्याकरता आयपीएलमध्ये खेळला नव्हता. त्याने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी जिंकून दिल्या. पॅट कमिन्स आयपीएल 2024 मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार असून त्याला मिनी ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यंदा पॅट कमिन्स हा सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व देखील करणार आहे.
केन विलियम्सन
न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर केन विलियम्सनसाठी आयपीएल 2023 अतिशय खराब ठरले. आयपीएल 2023 सामन्यात गुजरातकडून खेळणाऱ्या केन विलियम्सनला चेन्नई विरुद्ध पहिल्याच सामन्यात फिल्डिंग करताना पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर केन विलियम्सनला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. परंतु आता केन विलियम्सन दुखापतीतून बरा झाला असून आयपीएल 2024 मध्ये कमबॅक करणार आहे.
जॉनी बेयरस्टो
इंग्लंडचा स्टार क्रिकेटर जॉनी बेयरस्टो हा देखील पंजाब किंग्सकडून आयपीएल 2023 खेळू शकला नाही. स्पर्धेच्या ठीक आधी त्याने सर्जरी केल्याने त्याला आयपीएल 2023 ला मुकावे लागले होते. परंतु आता तो फिट झाला असून त्याने भारत विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये देखील दमदार कामगिरी केली. त्याच्या कमबॅकमुळे पंजाब किंग्सची टीम अधिक मजबूत होईल.
जसप्रीत बुमराह
भारतीय संघाचा नंबर 1 गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह आयपीएल 2024 मध्ये कमबॅक करणार आहे. दुखापत आणि सर्जरीमुळे जसप्रीत बुमराह गेल्यावर्षी आयपीएल 2023 चा भाग नव्हता. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये मुंबई टीमला त्याची कमतरता जाणवली. परंतु आता बुमराह फिट झाला असून त्याने भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजमध्ये एकूण 19 विकेट घेतले. तसेच एका सामन्यात तो प्लेअर ऑफ द मॅच देखील ठरला. त्यामुळे बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची बाजू भक्कम होईल यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : ध्रुव जुरेलने IPL च्या पहिल्या पगारातून केले ‘हे’ काम, जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क
- WPL 2024 : ‘मी बाद झाल्यानंतर…’, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवाचं खापर फोडलं असं