कुटुंब छोटं असो वा मोठं, त्याला सांभाळण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची गरज असते. पुरुष सत्ताक कुटूंब असलेल्या देशांत सहसा प्रत्येक कुटुंबाचा भार वडील किंवा आजोबा अशा व्यक्तींच्या खांद्यावर असतो. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, किराणा सामान, लाईट बिल अशा अनेक गोष्टींचा विचार करत त्यांना सगळं काही व्यवस्थित सांभाळावं लागतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घर सुरळीतपणे चालते. २१व्या शतकात स्त्री देखील मागे नसून ती देखील कुंटूंबाचा भार समर्थपणे पेलवताना दिसते. एकप्रकारे अशा व्यक्ती या कुटूंबाच्या कॅप्टनचं असतात. अगदी क्रिकेटमध्ये असतो तसा कॅप्टन. मराठीत आपण त्याला कर्णधार असंही म्हणतो.
अगदी याप्रमाणेच कोणत्याही क्रिडा प्रकारात संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी एका व्यक्तिची गरज असते. तो व्यक्ती म्हणजे कर्णधार.
कर्णधाराचे मुख्य काम असते, संघात योग्य संतुलन राखणे, रणनीती आखणे, संघातील खेळाडूंकडून उत्तमोत्तम प्रदर्शन करुन घेणे आणि आपल्या देशाला किंवा संघाला विजय मिळवून देणे. कोणत्याही खेळाडूसाठी आपल्या संघाचे नेतृत्त्व करणे ही काही छोटी गोष्ट नसते. कारण, कर्णधारावर पूर्ण संघाच्या जबाबदारीसह खूप दबावही असतो. जर संघ चांगले प्रदर्शन करत असेल, तर कर्णधाराला लोकांच्या नजरेत झिरोपासून हिरो बनायला काहीच वेळ लागत नाही. पण, हेच जर एका जरी महत्त्वाच्या सामन्यात संघाचे प्रदर्शन बिघडले, तर तोच कर्णधार एका झटक्यात लोकांसाठी हिरोपासून झिरो बनतो.
असे असले तरी, आजवर क्रिकेटजगतात अनेक शानदार कर्णधार होऊन गेले आहेत आणि सध्याही आहेत. भारतीय संघाविषयी बोलायचं झालं तर, कपिल देव, सौरभ गांगुली, एमएस धोनी, विराट कोहली असे दमदार कर्णधार भारताला लाभले आहेत. तसं तर, प्रत्येक संघाची कमान सांभाळणारे कर्णधार सध्या सर्व संघांकडे उपलब्ध आहेत. पण, त्यांच्यानंतर संघाच्या नेतृत्त्वाच्या जबाबदारीच काय?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची सुरुवात फार पुर्वीपासूनच केली जाते. संघात सलग दमदार प्रदर्शन करणाऱ्या, कसल्याही परिस्थितीचा सामना करु शकणाऱ्या, दवाबात असतानाही चोखपणे आपली कामगिरी पार पाडणाऱ्या खेळाडूवर लक्ष ठेवले जाते आणि त्याला भविष्यात ही संधी दिली जाते.
या लेखात जगभरातील टॉप-८ संघांच्या काही खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, जे पुढे जाऊन आपल्या क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळू शकतात.
तर बघूयात, कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकेल (Future Captains Of All Top-8 Cricket Teams Of The World) –
१. श्रेयस अय्यर (भारत)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीनंतर संघाच्या नेतृत्त्वाची कमान विराट कोहलीने सांभाळली. कोहलीनंतर जर मर्यादित षटकांच्या क्रिकेटविषयी बोलायचे झाले तर, रोहित शर्माचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. पण, सध्या कोणता भारतीय खेळाडू चांगले काम करताना दिसला आहे, तर तो आहे भारतीय संघाच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर.
या धाकड फलंदाजाने भारतीय संघात पदार्पण करताच कित्येक मोठ-मोठ्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने घाम फोडला. अय्यरला भारताकडून जेवढे सामने खेळण्याची संधी मिळाली, तेवढ्यात त्याने आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. अय्यरने भारताकडून केवळ १८ वनडे सामने खेळले आहेत. त्यातही त्याने १६ डावात फलंदाजी करत ७४८ धावा आपल्या खात्यात नोंदवल्या आहेत. तर, २१ टी२० सामन्यातील २० डावात फलंदाजी करत त्याने ४१७ धावा केल्या आहेत.
अय्यरकडे संघाचे नेतृत्त्व करण्याचा तगडा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व केले आहे. २०१८ आणि २०१९मध्ये तो दिल्ली संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ गतवर्षी प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. शिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतानाही त्याने संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणीची आकडेवारी प्रशंसनीय आहे.
२. बाबर आझम (पाकिस्तान)
पाकिस्तान निवडकर्ता समितीने सर्फराज अहमदला मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वपदावरुन हटवल्यानंतर, बाबर आझम याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. तर, पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार अजहर अली हा आहे.
वनडे आणि टी२० क्रिकेटमधील आझमची आकडेवारी दमदार आहे. त्याने आतापर्यंत ७४ वनडे सामने खेळत तब्बल ११ शतके ठोकली आहेत आणि ३३५९ धावा केल्या आहेत. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरुपात म्हणजे टी२० क्रिकेटमध्ये त्याने ३८ सामन्यात १४७१ धावा केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, या खेळाडूचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शनही शानदार राहिले आहे. त्याने केवळ २९ कसोटी सामन्यात ५ शतके ठोकत १९८६ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात त्याचे प्रदर्शन जबरदस्त आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या नवनियुक्त कर्णधार आझमच्या खांद्यावर कसोटी संघाच्या नेतृत्त्वाचीही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
३. बेन स्टोक्स (इंग्लंड)
इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स हा गेल्या काही वर्षांपासून शानदार प्रदर्शन करत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्याच्या सतत दमदार प्रदर्शानामुळे त्याला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुट आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन हे सध्या त्यांची जबाबदारी योग्यप्रकारे सांभाळत आहेत. पण, त्यांच्यानंतर जर कोणता इंग्लंडचा खेळाडू ही जबाबदारी चांगल्यारितीने सांभाळेल, तर तो स्टोक्स असेल.
जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टोक्सला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. जरी त्याच्या नेतृत्त्वाखालील तो सामना इंग्लंडने गमावला असेल, तरी त्या सामन्यातील इंग्लंड संघाचे प्रदर्शन चांगले राहिले होते. त्याची कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमधील आकडेवारीदेखील उल्लेखनीय आहे.
कसोटीत त्याने ६७ सामन्यात १० शतके ठोकत ४४२८ धावा केल्या आहेत. तर, त्याच्या खात्यात १५८ विकेट्सची नोंद आहे. वनडेतही त्याने ९५ सामन्यात ३ शतके ठोकत २६८२ धावा केल्या आहेत आणि टी२०त २६ सामन्यात ३०५ धावा केल्या आहेत. तर, वनडेत त्याने ७० आणि टी२०त १४ विकेट्स घेतल्या आहेत.
४. स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया संघात एकापेक्षा एक दमदार कर्णधार होऊन गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात संघाचे नेतृत्त्व केले होते. चेंडू छेडछाड प्रकरणात सापडल्यामुळे स्मिथवर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. पण, त्याने प्रतिबंधाचा कालावधी संपल्यानंतर दमदार पुनरागमन केले आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघाची कमान टिम पेन आणि आरोन फिंच हे सांभाळत आहेत. पण, त्यांच्यानंतर स्मिथला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून निवडण्यात येऊ शकते.
स्मिथने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण ३५ शतके केली आहेत. तर कसोटीत त्याने ७३ सामन्यात ७२२७ धावा केल्या आहेत. वनडेत त्याच्या १२५ सामन्यातील ४१६२ धावांची आणि टी२० ३९ सामन्यात ६८१ धावांची नोंद आहे.
५. क्विंटन डि कॉक (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या भविष्यातील नेतृत्त्वपदासाठी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डि कॉकला प्रबळ दावेदार समजले जात आहे. डि कॉकने खूप कमी वेळेत क्रिकेटजगतात मोठे नाव कमावले आहे. या धुरंधर फलंदाजाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या संघाचे नेतृत्त्व केले आहे. पण त्याला कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात डि कॉकची आकडेवारी उल्लेखनीय आहे. त्याने वनडेत १२१ सामन्यात तब्बल १५ शतके ठोकली आहेत. तर, कसोटीतही त्याच्या नावावर ५ शतकांची नोंद आहे. फाफ डू प्लेसिसने कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर डि कॉकला संधी मिळाली नाही. पण, भविष्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
६. राशिद खान (अफघानिस्तान)
अफघानिस्तान क्रिकेट संघाचे नाव काढले की, सर्वांच्या मुखात पहिले राशिद खानचे नाव येते. अफघानिस्तानच्या फिरकीपटू राशिदने मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजींने मात दिली आहे. एवढेच नव्हे तर, हा गोलंदाज फलंदाजीसाठी उतरल्यानंतरही कमालीचे प्रदर्शन करताना दिसला आहे.
तसं तर, अफघानिस्तान संघाचे कर्णधार खुप लवकर बदलताना दिसतात. पण, राशिद खानकडे जेव्हा ही जबाबदारी सोपवली जाईल, तेव्हा आपल्या जबरदस्त नेतृत्त्वाने तो अनेक वर्षांसाठी संघाचे नेतृत्त्व करण्याची शक्यता आहे. २०१९सालच्या विश्वचषकात त्याने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. तसेच, त्याच्या नावावर वनडेत १३३ विकेट्स, टी२०त ८९ विकेट्स आणि कसोटीत २३ विकेट्सची नोंद आहे.
७. कुशल परेरा (श्रीलंका)
श्रालंका संघाचा धाकड फलंदाज कुशल परेराने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात आपल्या जबरदस्त प्रदर्शनाने संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. लसिथ मलिंगाने संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड नव्या कर्णधारपदासाठी परेराची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.
३० वर्षीय परेराने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने वनडेत १०१ सामन्यात २८२५ धावा केल्या आहेत. तर, टी२० क्रिकेटमध्येही त्याने ४६ सामन्यात १२०० धावांचा टप्पा पार केला आहे. एवढेच नव्हे तर, केवळ १८ कसोटी सामन्यात परेराने १५३ धावांच्या सर्वोत्कृष्ट स्कोरसह ९३४ धावा केल्या आहेत.
८. शाय होप (वेस्ट इंडिज)
२०१५मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज शाय होप, संघातील दमदार खेळाडूंच्या गर्दीतही लवकरच नावारुपाला आला. वेस्ट इंडिजच्या कसोटी, वनडे आणि टी२० संघाची कमान सांभाळण्यासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शाय होपच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून दमदार प्रदर्शन करणाऱ्या होपला लवकरच संघाच्या कर्णधाररुपात पाहायला मिळू शकते.
२०१९सालच्या विश्वचषकात तो जास्त चांगली कामगिरी करु शकला नाही. पण, वेस्ट इंडिज संघाकडून वनडेत सर्वात जलद ३००० धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने केवळ ७२ वनडे सामन्यातील ६७ डावात फलंदाजी करताना हा पराक्रम केला होता. शिवाय अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
त्यामुळे जेसन होल्डर आणि कायरन पोलार्ड यांच्यानंतर शाय होपला भविष्यातील वेस्ट इंडिजच्या उत्तम कर्णधाररुपात पाहिले जात आहे.
ट्रेंडिंग लेख –
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये गोलंदाजांना धु धु धुणारे क्रिकेटर
आयपीएल फायनलमध्ये या ३ संघांनी पाहिले आहेत सर्वाधिक पराभव
या ४ भारतीय क्रिकेटपटूंवर आयपीएलमध्ये शतक कायमच रुसले
महत्त्वाच्या बातम्या –
सलग ३ वर्ष ३ वेगवेगळ्या संघांना आयपीएल जिंकून देणारा क्रिकेटर
तब्बल ७ लाख रुपयांना पडली होती एक धाव, आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर
एक नाही दोन नाही, तब्बल ८ संघाकडून आयपीएल खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटर