मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागत आहेत. इतकेच नव्हे तर क्रिकेटच्या खेळात देखील नवे नियम लागू करण्यात आले आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आयसीसीने हे नवे नियम लागू केले आहेत. चेंडूला चमक देण्यासाठी यापुढे खेळाडूंना लाळेचा वापर करता येणार नाही. असे केल्यास विरोधी संघाला पाच धावा बहाल करण्यात येईल.
यासोबतच आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये डीआरएस घेण्याची संख्या वाढवली आहे. यापुढे संघाला कसोटीत चार वेळा डीआरएस घेता येईल तर टी ट्वेंटीमध्ये दोन वेळा डीआरएसचा वापर करता येईल. आयसीसीने लागू केलेले हे नवे नियम तुम्हाला आश्चर्यचकित करणारे नसतील. मात्र, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीगमधील नवे नियम नक्कीच आश्चर्यचकित करतील.
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध क्रिकेट लीग बिग बॅश लीगमध्ये येत्या मौसमात सहा नवे नियम लागू करण्यात आले आहेत. सामन्यात दोन्ही संघांच्या प्रत्येकी पहिल्या 10 षटकात धावा पाहिल्या जातील. ज्या संघाच्या धावा 10 षटकात जास्त असतील त्या संघाला अतिरिक्त बोनस अंक मिळतील.
एका सामन्यात पहिल्या दहा षटकांनंतर दोन्ही संघांना पर्यायी खेळाडू मैदानामध्ये उतरता येईल. हा नियम फुटबॉलच्या धर्तीवर लागू करण्यात आला असून परिस्थिती अनुसार खेळाडूंना बदल करण्यात येणार आहे. यासोबतच सामन्यांमध्ये दोन पॉवर प्ले असणार आहेत. ज्यातील पहिला पॉवरप्ले चार षटकांचा असेल तर दुसरा पॉवरप्ले फलंदाज आपल्या मर्जीप्रमाणे कधीही घेऊ शकतो.
क्रिकेटच्या नियमानुसार आतापर्यंत गोलंदाजांनी नोबॉल फेकल्यानंतर फ्री हिट दिला जायचा. बिग बॅश लीगमध्ये यापुढे प्रत्येक वाईट चेंडूनंतर फ्री देण्याचा नवा नियम लागू केला आहे. वास्तविक पाहता बिग बॅश लीगमधील हे सर्व नियम गोलंदाजांना अवघड ठरणार आहेत.
क्रिकेटमधला खेळ अधिक रोमांचक करण्यासाठी असे नियम बनवण्यात आले आहे. तसेच प्रत्येक पाच षटकानंतर रणनीती बनवण्यासाठी ब्रेक घेण्यात येणार आहे. या ब्रेकमुळे या लीगला जाहिरातीच्या माध्यामातून प्रचंड पैसा मिळणार आहे.