जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा सोळावा हंगाम समाप्त होऊन दोन महिनाभराचा अवधी लोटला असतानाच, संघांनी आता पुढील हंगामाची तयारी देखील सुरू केली आहे. आपल्या पहिल्या दोन हंगामात प्ले ऑफपर्यंत मजल मारणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला जस्टिन लँगर यांच्या रूपाने नवे प्रशिक्षक मिळाले आहेत. भारताचा माजी सलामीवीर व लखनऊचा मेंटर गौतम गंभीर हा संघाचे मेंटरपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
लखनऊ संघाने मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लावर यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट म्हणून भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक निवडसमितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची नियुक्ती केली. यासोबतच गोलंदाजी प्रशिक्षकपद दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज मॉर्नी मॉर्केल याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मेंटर गौतम गंभीर संघाची साथ सोडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, लखनऊ संघ व्यवस्थापन व गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नाही. त्यामुळे गंभीर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्सने गंभीरशी संपर्क साधला असून, ते त्याला आपला मेंटर बनवण्यास इच्छुक आहेत. याबाबतीत स्वतः गंभीर देखील सकारात्मक असल्याचे बोलले जाते.
गंभीर हा 2011 ते 2017 या कालावधीत केकेआरचा कर्णधार होता. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने 2012 व 2014 असे दोन वर्ष आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले. गंभीरने संघाची साथ सोडल्यानंतर सहा वर्षात संघ केवळ दोन वेळा प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करू शकला आहे. अशा परिस्थितीत संघाला पुन्हा एकदा यशस्वी करण्याची धुरा गंभीरकडे दिली जाऊ शकते.
(Gautam Gambhir Might Leave Lucknow Supergiants And Join KKR)
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत अभिजीत गुप्ता, अभिमन्यू पुराणिक, सेतुरामन एसपी, सुर्य शेखर गांगुली यांची विजयी सलामी
मिनी ऑरेंज आयटीएफ मिश्र रिले राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक