टी२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी (४ ऑक्टोबर) वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. अबुधाबी येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीज संघाला पराभवास सामोरे जावे लागले. यासह वेस्ट इंडिज संघ स्पर्धेतून अधिकृतरीत्या बाहेर पडला. मात्र, या सामन्यात वेस्ट इंडीजचा अनुभवी सलामीवीर ख्रिस गेल याच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला.
गेलच्या नावावर जमा झाला नकोसा विक्रम
या सामन्यात श्रीलंकेने १९० धावांचे लक्ष दिल्यानंतर हे आव्हान पूर्ण करण्याची जबाबदारी अनुभवी सलामीवीर ख्रिस गेलच्या खांद्यावर होती. टी२० क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट असलेला गेल या सामन्यात मात्र सपशेल अपयशी ठरला. तो पाच चेंडू खेळून दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर बिनूरा फर्नांडोच्या गोलंदाजीवर वनिंदू हसरंगाच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने केवळ एक धाव केली.
नकोश्या विक्रमात केली आफ्रिदीची बरोबरी
या सामन्यात केवळ एक धाव काढून बाद होताच त्याने एका नकोश्या विक्रमात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची बरोबरी केली. गेल आता टी२० विश्वचषकात तेराव्या वेळी एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. आफ्रिदीदेखील २००७-२०१६ या काळात सहा टी२० विश्वचषकात १३ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झालेला. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, बांगलादेशचा मुशफिकूर रहीम, पाकिस्तानचा कामरान अकमल व ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर हे प्रत्येकी १२ वेळा टी२० विश्वचषकात एकेरी धावसंख्येवर बाद झाले आहेत.
वेस्ट इंडीजचा आणखी एक पराभव
विजयाच्या अपेक्षेने या सामन्यात उतरलेल्या वेस्ट इंडीजला स्पर्धेतील तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना चरिथ असलंका व पथुम निसंका यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १८९ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडीजचा संघ १६९ पर्यंत मजल मारू शकला. शिमरन हेटमायर याने वेस्ट इंडीजसाठी ८० धावांची नाबाद खेळी केली. या पराभवामुळे वेस्ट इंडीज संघ अधिकृतपणे या स्पर्धेतून बाहेर गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूला करावे भारतीय संघाचा कर्णधार, दिनेश कार्तिकने दिला सल्ला,