ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करून मालिका जिंकली. न्यूझीलंडच्या संघाने ५ सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली. मात्र, मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशाम आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांनी एकमेकांच्या जर्सीची अदलाबदली केली. या जर्सीवर निशामने एक खास संदेशही लिहून दिला.
जर्सीची केली अदलाबदली
आयपीएल २०२० मध्ये जिमी निशाम व ग्लेन मॅक्सवेल हे किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये एकत्र खेळत होते. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मॅक्सवेलने निशामच्या एका षटकात २८ धावा लुटल्या होत्या. त्यामध्ये चार चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.
या घटनेची आठवण म्हणून मॅक्सवेल आणि निशामने एकमेकांची जर्सी बदली केली. याबाबतचे एक छायाचित्र दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले. निशामने आपल्या जर्सीवर मॅक्सवेलसाठी एक संदेशदेखील लिहीला. निशामने आपल्या जर्सीवर ‘टू मॅक्सी ४,६,४,४,४,६’ असे लिहून आपली स्वाक्षरी केली आहे. दोघांचे हे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडने मालिका केली आपल्या नावे
पाच सामन्यांची टी२० मालिका न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला हरवत आपल्या नावे केली. पहिले दोन सामने न्यूझीलंडने जिंकल्यानंतर पुढील दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. त्यामुळे, अखेरच्या सामन्याला अधिकचे महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, मार्टिन गप्टिलने तुफानी फलंदाजी करत न्यूझीलंडला सामन्यात एकतर्फी विजय मिळवून देत मालिका जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला. संपूर्ण मालिकेत १३ बळी मिळवणारा न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोढी याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२१ : गोव्याला सडनडेथमध्ये हरवून मुंबई सिटी अंतिम फेरीत
एकाच वेळी भारताचे दोन संघ खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट? वाचा काय आहे प्रकरण
नव्या कर्णधारासह राजस्थान दुसऱ्या जेतेपदावर लावणार मोहर? वाचा कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत