‘गुगल’ हे एक असे सर्च इंजिन आहे, ज्याचा कोटींच्या घरात लोक वापर करतात. अगदी लहानसहान गोष्टीपांसून ते मोठमोठ्या गोष्टींची माहिती गुगलवर उपलब्ध असते. परंतु कधी-कधी याच गुगलवर चुकीच्या गोष्टीही घडताना दिसतात. याचे उदाहरण सांगायचे झाले तर, अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याची पत्नी म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे नाव दाखवणे. अशाच प्रकारे गुगलने पुन्हा एकदा मोठी चूक केली आहे. ही चूक भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत झाली आहे.
शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नई येथे चालू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर संध्याकाळी अचानक गुगलने शास्त्रींचे वय १२० वर्षे दाखवायला सुरुवात केली आहे. गुगलवर ‘Ravi Shastri Age’ असे सर्च केल्यास नेटकऱ्यांना शास्त्रींचे वय चक्क १०० हून अधिक दिसत असल्याने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
असे म्हटले जात आहे की, एवढी मोठी गडबड ही गुगलवरील विकिपीडियामुळे झाली आहे. विकिपीडियाने शास्त्रींच्या जन्म तारखेत बदल करून चुकीने त्यांचा जन्म २७ मे १९०० रोजी झाला असल्याचे लिहिले आहे. यामुळे विकियापीडिया बरोबर गुगलवरही त्यांचे वय १२० दिसत आहे.
काय आहे शास्त्रींचे खरे वय ?
खरे तर, माजी भारतीय क्रिकेटपटू शास्त्री यांचा जन्म २१ मे १९६२ रोजी झाला होता. त्यानुसार त्यांचे खरे वय ५९ वर्षे आहे. यावर्षी मे महिन्यात ते ६० वर्षांचे होतील.
रवी शास्त्रींची क्रिकेट कारकिर्द
शास्त्रींच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल पाहायचे झाले तर, फेब्रुवारी १९८१ मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर डिसेंबर १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यादरम्यान त्यांनी भारताकडून १५० वनडे सामने खेळले असून १२९ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ४ शतकांसह ३१०८ धावा केल्या होत्या. याबरोबरच ८० कसोटी सामन्यात १५१ विकेट्स आणि ३८३० धावांची कामगिरी केली होती.