भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा नुकताच कोरोनातून बरा झाला आहे, परंतु त्याचा क्वारंटाईन कालावधी संपायला अजून वेळ आहे. साहा बर्याच दिवसांपासून क्वारंटीनमध्ये आहे हे विशेष. साहाचा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला असून, लवकरच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. दरम्यान, नुकतीच साहाने एका मुलाखतीत काही महत्त्वाच्या बाबींवर प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना साहा म्हणाला की, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा संघात होता तेव्हा मला नियमितपणे सामने खेळण्याची संधी मिळत नसे. यानंतर मी 2014 ते 2018 पर्यंत संघात खेळत होतो. मात्र मी 2018 साली जखमी झालो व त्यानंतर दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल आणि रिषभ पंतला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. साहाने स्पष्ट केले की रिषभने आपल्या क्षमतेच्या बळावर संघात स्थान मिळवले आहे. त्याने संधीचा पूर्ण फायदा उचलला.
साहाच्या कारकिर्दीचा विचार केला असता, त्याने 6 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. यानंतर साहाने जानेवारी 2012 मध्ये दुसरा सामना खेळला आणि त्यानंतर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला कसोटी कारकिर्दीतील तिसरा सामना खेळला. धोनी डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. यानंतर साहाला कसोटी क्रिकेटमध्ये नियमित संधी मिळत होत्या.
जेव्हा साहाला आपल्या कारकिर्दीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा साहा म्हणाला की प्रत्येक खेळाडूला कारकिर्दीत चढउतारांचा सामना करावा लागतो.
दरम्यान भारतीय संघ आगामी काळात इंग्लंडचा बहुप्रतीक्षित दौरा करणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात 18 जून ते 22 जून दरम्यान न्युझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की पंत व साहा यांच्यामध्ये कोणत्या खेळाडूला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी दिली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे व्वा! श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज; व्हिडिओ शेअर करत दिले संकेत
दु:खद! माजी भारतीय क्रिकेटपटूच्या आईचे निधन, विराटने केली होती आर्थिक मदत