भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ अशा फरकाने सध्या आघाडीवर असून अखेरचा सामना अजून बाकी आहे. या मालिकेत आत्तापर्यंत अक्षर पटेलने चांगली कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेदरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची कमी भारतीय संघाला भासू दिलेली नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल कौतुकास्पद चर्चा होत आहे. आता त्याच्या कामगिरीबद्दल आणि जडेजाच्या अनुपस्थितीबद्दल सुनील गावसकर आणि ग्रॅमी स्वानने प्रतिक्रिया दिली आहे.
जडेजा दुखापतीमुळे संघातून बाहेर
रविंद्र जडेजाला जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात खेळताना हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यादरम्यान त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करतण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिन्यापासून तो क्रिकेटपासून लांब आहे. त्याला इंग्लंडविरुद्धची चालू असलेली कसोटी मालिका तसेच त्यानंतर होणाऱ्या टी२० मालिकेलाही मुकावे लागणार आहे.
अक्षरने भरुन काढली जडेजाची कमी
जडेजा संघात नसल्याने त्याची कमी कोण भरुन काढणार हा प्रश्न सर्वांना सतावत होता. कारण ज्यावेळी जडेजा दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत फिरकी गोलंदाज म्हणून जडेजाची कमी भरुन काढली. अक्षरने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. तो या मालिकेत २ सामने खेळला असून त्याने एकूण १८ विकेट्स घेतल्या आहेत. यातील ११ विकेट्स त्याने अहमदाबादला झालेल्या दिवस-रात्र कसोटीदरम्यान घेतल्या.
जडेजा विचार करत असेल, त्याची दुखापत बरी व्हायला वेळ कसा लागला – गावसकर
अक्षरची कामगिरी पाहून जडेजाच्या दुखापतीबद्दल सुनील गावसकरांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे की “जडेजा आता विचार करत असेल की त्याच्या अंगठ्याला काय झाले आहे. तो डॉक्टरांना विचारत असेल की त्याचा फ्रॅक्चर झालेला अंगठा बरा होण्यासाठी इतकावेळ का लागत आहे. त्याला १० जानेवारीला अंगठ्याला दुखापत झाली आहे आणि आता फेब्रुवारी संपला आहे, त्यामुळे या दुखापतीतून बाहेर यायला खूप वेळ लागत आहे.’
सध्या जडेजाचा अंगठा बरा झाला असून तो बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करेल. तसेच तिथे त्याच्या दुखापतीवरही लक्ष दिले जाईल.
जडेजा इंग्लंडकडून खेळू शकतो – स्वान
गावसकरांचे बोलणे ऐकल्यानंतर त्याच चर्चेदरम्यान स्वानने गमतीने म्हटले की जडेजा इंग्लंडकडून खेळू शकतो. स्वान म्हणाला, ‘मी जडेजाचा मोठा चाहता आहे. अक्षरला चांगली कामगिरी करताना पाहून मला वाटत हे की जडेजा इंग्लंडसाठी खेळू शकतो’
भारत आणि इंग्लंड संघात चौथा सामना ४ मार्चपासून अहमदाबादला होणार आहे. या सामन्यात अक्षर अंतिम ११ जणांच्या भारतीय संघाकडून खेळणे जवळपास निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आर अश्विन विरुद्ध हरभजन सिंग कोण आहे सर्वश्रेष्ठ? गौतम गंभीरने दिले ‘हे’ उत्तर
जोकोविचच ‘अव्वल’! ३१० व्या आठड्यात पहिल्या क्रमांकावर कायम राहात फेडररच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
रोहितसह ‘हे’ खेळाडू होऊ शकतात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर