शनिवारी (दि. 29 एप्रिल) गुजरात टायटन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. विशेष म्हणजे, याच दिवशी गुजरातचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा याने 44वा वाढदिवस साजरा केला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडिअमवर कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यादरम्यान नेहरा मस्तीच्या मूडमध्ये दिसला. जेव्हा मोहम्मद शमी आणि जोशुआ लिटल यांनी कोलकाताला 179 धावांवर रोखले, तेव्हा नेहराने कॅमेराकडे पाहून थम्सअप केले. नेहराने गुजरातच्या गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. अशातच आता नेहराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तोदेखील हसू रोखू शकणार नाही.
खरं तर, कोलकाता विरुद्ध गुजरात संघातील हा सामना पावसामुळे नियोजित वेळेवर न होता थोड्या उशिरानंतर सुरू झाला. अशात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मजा-मस्ती करण्यासाठी मोकळा वेळ मिळाला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये सामन्यापूर्वी आशिष नेहरा आणि मुरली कार्तिक (Ashish Nehra And Murali Karthik) हे दोघेही खेळपट्टीजवळ बोलताना दिसत आहेत. यादरम्यान नेहरा अचानक माजी संघसहकारी आणि प्रेझेंटर कार्तिकच्या अवघड जागेवर लाथ मारतो. कार्तिक यावेळी वेदनेने विव्हळत खाली कोसळतो. त्यानंतर नेहरा हात पकडून त्याला उठवतो. कार्तिकही उठल्यानंतर नेहरासोबत तेच करतो, पण नेहरा यावेळी स्वत:चा बचाव करतो. मुरलीला जेव्हा याबाबत विचारले जाते, तेव्हा तो म्हणतो की, हे सांगण्यासारखे नाहीये.
गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वलस्थानी
सामन्याविषयी बोलायचं झालं, कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना रहमानुल्लाह गुरबाज याच्या 81 धावांच्या जोरावर 179 धावांचे योगदान दिले होते. यामध्ये आंद्रे रसेल याच्या 34 धावांचेही योगदान होते. यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच, नूर अहमद आणि जोशुआ लिटल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. गुजरातने विजय शंकर याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताला 13 चेंडू शिल्लक ठेवून 7 विकेट्सने पराभूत केले. यासह गुजरातने 10 संघांच्या गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले.
कोलकाताच्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शुबमन गिल याने 35 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. यानंतर विजय शंकर याने त्याचा जलवा दाखवला. त्याने 24 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. त्याने यादरम्यान डेविड मिलर (18 चेंडूत नाबाद 32 धावा) याच्यासोबत 39 चेंडूत 87 धावांची नाबाद भागीदारी रचली. त्यामुळे गुजरातने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत हे आव्हान पार केले. (gujarat titans bowling coach ashish nehra kicked murali kartik before kkrvgt match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: रोहित शर्माचे ‘हे’ 5 विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य
रोहित शर्मा- एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार






