---Advertisement---

पंड्यासेनेपुढे हैदराबादने टेकले गुडघे! शानदार विजयासह दिमाखात केला प्ले-ऑफमध्ये प्रवेश

On: सोमवार, मे 15, 2023 11:25 PM
Mohammed-Shami
---Advertisement---

सोमवारी (दि. 15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 62वा सामना पार पडला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात गुजरात संघाने 34 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरात संघाने आयपीएल 2023च्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा गुजरात हंगामातील पहिलाच संघ बनला. गुजरातच्या या विजयात शुबमन गिल, मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी मोलाचे योगदान दिले.

या सामन्यात हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय गुजरात संघाच्या खेळाडूंनी चुकीचा ठरवला. यावेळी गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 188 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला 9 विकेट्स गमावत फक्त 154 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना गुजरातने 34 धावांनी जिंकला.

https://twitter.com/IPL/status/1658168493299335170

शमी-शर्माची जबरदस्त गोलंदाजी
हैदराबादकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज हेन्रीच क्लासेन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 44 चेंडूत 64 धावा केल्या. यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणताच फलंदाज खास खेळी करू शकला नाही.  भुवनेश्वर कमार याने 27 आणि मयंक मार्कंडे याने नाबाद 18 धावांचे योगदान दिले. सलामीवीर अनमोलप्री सिंग आणि अभिषेक शर्मा अनुक्रमे 5 आणि 4 धावांवर बाद झाले. तसेच, कर्णधार मार्करम 10 धावा करून बाद झाला. याव्यतिरिक्त राहुल त्रिपाठी (1), सनवीर सिंग (7), अब्दुल समद (4), मार्को यान्सेन (3) यांना दोन आकडी धावसंख्याही करता आली नाही.

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 20 धावा खर्च करत 4 विकेट्स नावावर केल्या. तसेच, मोहितने 4 षटके गोलंदाजी करताना 28  धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त यश दयाल यानेही 1 विकेट घेतली.

गिलचे वादळी शतक
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून शुबमन गिल चमकला. त्याने सर्वाधिक धावा तर केल्याच, पण सोबत शतकही साजरे केले. त्याने यावेळी 58 चेंडूंचा सामना करताना 101 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 13 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त साई सुदर्शन याने 47 धावांचा पाऊस पाडला. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. वृद्धिमान साहा, राशिद खान, नूर अहमद आणि मोहम्मद शमी यांनी शून्यावर विकेट गमावली. संघाने 188 धावा केल्या. त्यातील 147 धावा या फक्त शुबमन आणि साईच्या भागीदारीमुळे झाल्या.

भुवनेश्वरचे विकेट्सचे पंचक
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) चमकला. त्याने यावेळी गोलंदाजी करताना 4 षटकात 30 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये विकेट्सचे पंचक घेण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. त्याच्याव्यतिरिक्त मार्को यान्सेन, फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.

या विजयासह गुजरात संघाचे 13 सामन्यात 9 सामने जिंकून 18 गुण झाले. गुजरात गुणतालिकेत अव्वलस्थानी असून प्ले-ऑफमध्येही पोहोचला आहे. गुजरातचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 21 मे रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडणार आहे. हा हंगामातील अखेरचा साखळी सामना असेल. (Gujarat Titans won by 34 runs against Sunrisers Hyderabad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोंबला! चेन्नईचे 16.25 कोटी पाण्यात, IPL मध्येच सोडून ‘या’ दिवशी मायदेशी परतणार स्टोक्स; लगेच वाचा
गुजरातचं कंबरडं मोडत भुवीने रचला इतिहास! IPLमध्ये एकदा नाही, तर दुसऱ्यांदा केली जबरदस्त कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---