भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचत पहिल्यांदाच टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनल सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 1-0 असे नमवले. भारतीय महिला संघाचा हा तिसरा ऑलम्पिक दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत पदकाच्या अपेक्षा उंचावल्याने सर्व स्तरांतून भारतीय महिला हॉकी संघाचे कौतुक होत आहे.
या सामन्यात भारताकडून एकमात्र गोल गुरजीत कौरने केला होता. यासह ‘ड्रॅग फ्लिकर’ म्हणून खेळणारी गुरजीत ऐतिहासिक कामगिरीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. मुळात पंजाबची असलेल्या गुरजीतचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायी राहिली आहे.
तिचे वडील शेतकरी आहेत. लहानपणी तिचे वडील तिला आणि तिच्या बहिणीला सायकलने शाळेत घेऊन जायचे. त्यानंतर तिच्या वडिलांनी दोन्ही बहिणींना बोर्डिंगमध्ये घातले. तिथेच गुरुजीतला हॉकीचे बाळकडू मिळाले. 25 वर्षीय गुरजीतने पहिल्यांदा 2014 मध्ये वरिष्ठ भारतीय संघाच्या नॅशनल कॅपमध्ये जागा मिळवली. परंतु संघात जागा मिळवण्यासाठी तिला खूप झगडावे लागले.
2017 च्या ‘आशिया चषक’मध्ये भारत जिंकला आणि विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. गुरजीतने या स्पर्धेत आठ गोल केले होते. सेमी-फायनलमध्ये तिने जपान विरुद्ध दोन महत्वपूर्ण गोल केले होते. भारताने याच गोलांच्या जोरावर त्यावेळी अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेला विजयानंतर गुरजीत कौर म्हणाली, “आज खूप अभिमानाचा दिवस आहे. इतकी वर्षे कठोर मेहनत करत होते, त्याच मेहनतीचे हे फळ आहे. संपूर्ण संघाने यासाठी परिश्रम घेतले होते. आम्ही पहिल्यांदाच सेमी-फायनलमध्ये पोहोचलो आहोत. ही आमच्यासाठी मोठी बाब आहे. आम्ही पुढच्या सामन्यासाठी तयारी करत आहोत. आम्हाला सर्वांचे सहकार्य लाभले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा इंग्लंडविरुद्ध करणार सलामीला फलंदाजी? उपकर्णधार रहाणेने दिले ‘हे’ उत्तर
‘नेक्स्ट स्टॉप इंग्लंड’! अखेर सूर्यकुमार अन् पृथ्वीने इंग्लंडसाठी भरली उड्डाण, फोटो केले शेअर
धोनीने ६ वर्षांपूर्वी ‘तो’ सल्ला दिला, म्हणूनच मी चांगला फलंदाज बनलो; जडेजाचा मोठा उलगडा