मुंबई । ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी 3 कसोटी आणि 3 टी-20 सामन्यासाठी 29 सदस्यीय संघाची घोषणा केली. नव्या दमाचा हैदर अली या खेळाडूने स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघात पहिल्यांदा स्थान मिळाले.
निवड समितीने माजी कर्णधार सर्फराज अहमद याला देखील संघात स्थान दिले आहे. सर्फराजने त्याचा शेवटचा सामना ऑक्टोबर 2019 मध्ये खेळला होता. वेगवान गोलंदाज सोहेल खान याने चार वर्षांनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने त्याचा शेवटचा सामना 2017 साली खेळला होता.
हैदरने 2019-20 या वर्षात दमदार कामगिरी केली होती. 19- वर्षाखालील विश्वचषकात पाकिस्तानकडून खेळताना सर्वाधिक धावा काढण्यात तो दुसऱ्या क्रमांकावर होता. हैदर अली शिवाय काशीफ भट्टी हा दुसरा नवा चेहरा आहे. काशिफची ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्याला सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
मोहम्मद आमिर दुसऱ्यांदा वडील होणार असल्याने तो इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही तर हॅरिस सोहेल हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला पाकिस्तानचा संघ-
आबिद अली, फखर जमान, इमाम उल हक, शान मसूद, अझर अली (कर्णधार), बाबर आझम (कसोटी उपकर्णधार आणि टी२० कर्णधार), असद शफिक, फवाद आलम, हैदर अली, इफ्तिहार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद रिझ्वान आणि सरफराज अहमद (यष्टीरक्षक), फाहिम अश्रफ, हॅरिस रऊफ, इम्रान खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, सोहेल खान, उस्मान शिंवरी, वहाब रियाज, इमाद वसीम, कशिफ भट्टी, शादाब खान, यासिर शाह.